सुदानला दहशतवादाच्या यादीतून हटवणार – ट्रम्प

कैरो – सुदानमध्ये दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या अमेरिकेच्या पीडीतांच्या वारसांना 335 दशलक्ष डॉलर देण्याच्या आपल्या वचनाचे पालन केले तर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशंच्या यादीतून सुदानला हटवले जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र या नुकसानभरपाईबाबत काही पीडीत अजूनही असमाधानी आहेत.

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांच्या यादीतून अमेरिकेने सुदानला वगळले, तर सुदानला आंतरराष्ट्रीय कर्ज मिळू शकेल. याशिवाय अत्यंत हालाखीच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि देशात स्थित्यंतर घडून अस्तित्वात येत असलेल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी अत्यंत गरजेची आंतरराष्ट्रीय मदतही मिळू शकेल.

अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक दोन आठवड्यांवर आली आहे. त्यातच संयुक्‍त अरब अमिराती आणि बहारिनप्रमाणे इस्राईलबरोबर समन्वय साधण्यासाठी ट्रम्प प्रशासन सुदानसारख्या देशांबाबतही प्रयत्नशील आहे.

केनिया आणि टांझानियातील अमेरिकेच्या दूतावासात 1998 मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. ओसामा बिन लादेन सुदानमध्ये रहात असताना अल कायदाच्या नेटवर्कने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. म्हणून या बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्याचे सुदानने मान्य केले आहे.

सुदानला दहशतवादी देशांच्या यादीतून हटवण्याचा निर्णय म्हणजे विधायक पाऊल आहे, असे म्हणून सुदानच्या सत्ताधारी सार्वभौम परिषदेचे प्रमुख जनरल अब्देल-फराह बुरहान यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सुदानमधील हुकुमशहा ओमर अल बशीर यांचे सरकार सुदानमधील सैन्याने 2019 मध्ये उलथवले होते. सुदानमध्ये 2022 साली सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.