नवी दिल्ली – अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी इलिनोइस प्रांतात होणार्या निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भाग घेता येणार नाही. इलिनोइस प्रांताच्या न्यायालयाने ट्रम्प यांना निवडणूकीत भाग घेण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरांवरील बंदीच्या १४ व्या दुरुस्ती नियमाच्या आधारे ट्रम्प यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ट्रम्प यांना या निर्णयाला आव्हान देणे शक्य व्हावे, यासाठी या निर्णयाला स्थगिती देखील दिली गेली आहे. याच नियमाच्या आधारे कोलोरॅडो मधील न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आव्हान याचिकेवरील निर्णय सवोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच इलिनोइस न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे.
ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवला जाण्याची शक्यता कमी आहे. कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने ज्या निकषांच्या आणि नियमांच्या आधारे ट्रम्प यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे, त्याचा संदर्भ घेऊन इलिनोइसमधील कूक कौंटीचे न्यायाधीश ट्रेसी पोर्टर यांनी ट्रमप यांचा निवडणुकीतील सहभाग रोखला आहे. इलिनोइसमध्ये १९ मार्च रोजी प्रायमरीचे मतदान होणार आहे. या प्रायमरीमध्ये उमेदवारांच्या यादीतून ट्रम्प यांचे नाव हटवण्यात यावे, असे निर्देश द इलिनोइस स्टेट बोर्ड ऑफ इलेक्शनला देण्यात आले आहेत.
इलिनॉइस स्टेट बोर्ड ऑफ इलेक्शन्सने ट्रम्पविरोधी आव्हान फेटाळल्यानंतर एका महिन्यानंतर न्यायाधीशांनी ट्रम्प यांचे नाव मतपत्रिकेतूनच काढून टाकले आहे.अर्थात या निर्णयाला ट्रम्प आव्हान देऊ शकतात. अन्य काही प्रांतांमध्ये अशाच प्रकारच्या निर्णयाला त्यांनी यापूर्वीच आव्हान दिले आहे.
ट्रम्प यांचे नाव मतपत्रिकेतूनच वगळण्यात यावे, या मागणीसाठी द ऍडव्होकसी ग्रुप या संस्थेने मिशीगन, मिनेसोटा आणि ओरेगोन या प्रांतांमद्येही स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
कॅपिटल हिलवरील धुडगूसामागील सूत्रधार…
दिनांक ६ जानेवारी २०२१ रोजी अद्यक्षीय निवडणुकांच्या निकालानंतर सत्तां हस्तांतर करण्यापूर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल या अमेरिकेच्या संसदेमध्ये घुसून धुडगूस घातला होता. या मागे ट्रम्प यांचीच चिथावणी होती, हे सिद्ध झाल्याने बंडखोरीविरोधी नियमाच्या आधारे त्यांना निवडणूकीत सहभागी होण्यापासून रोखण्याचा निर्णय सर्वप्रथम कोलोरॅडो न्यायालयाने दिला होता.