‘टीआरपी घोटाळा दाबला जात होता’

कॉंग्रेस प्रवक्‍ते तिवारी यांचा आरोप

पुणे – केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते मंत्र्यांचे वृत्तवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याकडे लक्ष हवे होते. परंतु, कोट्यवधींच्या हा घोटाळा दाबण्याची केंद्र सरकार भूमिका घेत होते, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्‍ते गोपाळदादा तिवारी यांना केला आहे.

मुंबई पोलिसांनी नुकताच दूरचित्र वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू असलेला टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. याबाबत प्रवक्‍ते तिवारी बोलत होते. ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी उघडकीला आणलेला टीआरपी घोटाळा स्वतंत्र भारतातील पहिला घोटाळा असून याची थेट जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून प्रकाश जावडेकर यांच्याकडे जाते. त्यांच्या खात्याकडून हा मोठा घोटाळा दुर्लक्षित कसा झाला? याचा खुलासा जावडेकर यांनी करायला हवा, अशी मागणीही गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते म्हणाले, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काही निवडक वृत्तवाहिन्यांची एकांगी, लहरीपणाची व प्रसंगी टोकाची भूमिका घेण्यात वाढ झाली आहे. सामाजिक वातावरण सोईने प्रक्षोभक बनवण्याची वृत्तीदेखील बळावल्याचे निदर्शनास येत आहे. ज्वलंत समस्या व महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला ठेऊन अशी एकांगी, किळसवाणी पत्रकारिता गेली काही दिवस दूरचित्र वाहिन्यांमध्ये सुरू असल्याबाबतही तिवारी यांनी खंत व्यक्त केली.

प्रिंट मीडियाची विश्‍वासार्हता अधोरेखित…
पत्रकारितेच्या मूळ धर्मापासून दूर जाऊन, हव्या त्या विषयावर मीडिया ट्रायल घडवून आणायची व न्यायालयीन व पोलीस प्रशासनिक तपास यंत्रणांचे प्रयत्न मोडीत काढीत आपणास हवा तो नॅरेटीव्ह (कथा-वृत्तांत) निर्माण करायचा व त्या आधारे मोठ्या कंपन्या व जाहिरातदारांचा पैसा लुबाडायचा, असा प्रकार सर्रास चालला होता. हे मुंबई पोलिसांनी पुढे आणले आहे. यातून प्रिंट मीडियाची विश्‍वासार्हता आणि गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असल्याचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.