देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. उर्वशी रौतेलाने देखील असेच एक ट्विट केले आहे. मात्र या ट्वीटमुळे ती खूपच ट्रोल झाली आहे. उर्वशीने ऑस्कर विजेता चित्रपट “पॅरासाइट’बद्दल शेअर केलेली पोस्ट ट्विटरवर ट्रोल झाली आहे.
ऑस्कर विजेता चित्रपट पॅरॅसाइट काही दिवसांपूर्वी ऍमेझॉन प्राइम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी या चित्रपटाबाबत आपापली समीक्षा लिहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील त्यासंदर्भात एक ट्विट केले. या चित्रपटाबाबत तिला कोणती बाब आवडली, हे तिने ट्वीटमध्ये मांडले आहे.
मात्र झाले असे की, तिने हे ट्विट न्यूयॉर्कमधील लेखकाचं कॉपी केले असल्याची टीका एका ट्विटर युजरने केली आहे. श्रीमी वर्मा या ट्विटर युजरने दोन्ही ट्वीटचा स्क्रीनशॉट एकत्र करून फोटो देखील शेअर केला आहे. एखाद्याचं ट्विट कॉपी करण्यापेक्षा तिने निदान व्याकरण सुधारून/बदलणं गरजेचे होते, अशी कॅप्शन देत या युजरने ट्विट केले आहे. तिचं हे ट्विट मूळ लेखकाने सुद्धा रिट्विट केले आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर उर्वशी रौतेलाच्या ट्वीटवर ट्रोल करणाऱ्या कमेंट्स आल्या आहेत. ट्विट कॉपी करून लेखकाला क्रेडिट देखील न दिल्यामुळे उर्वशीवर टीका देखील करण्यात आली. उर्वशीची पॅरासाइटसारख्या गंभीर विषयावरील चित्रपटावर मत मांडण्याची क्षमता नाही, असाही काही जणांनी तिला टोला लगाविला.