अमित डोंगरे
हिंदी चित्रपटसृष्टीत कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. एका रात्रीत सुपरस्टार होणारे अभिनेते कधी काळाच्या पडद्याआड जातात हेच कळत नाही. पैसा, यश, प्रसिद्धी, मान-सन्मान सगळं काही मिळूनही नैराश्य येते व सुशांतसिंह राजपूतने घेतला तसा टोकाचा निर्णय घेतला जातो…
वयाची पस्तिशीही पार केलेली नसताना सुशांतने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यापेक्षाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला असावा. अशी कोणती गोष्ट होती की त्याने आपले जीवन संपवले. कोणतीही घटना जेव्हा घडते तेव्हा त्याबाबत काही प्रश्न निर्माण होतात. सुशांतच्या मृत्यूनेही असे बरेच प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत.
“किस देश में है मेरा दील’ या मालिकेतून डेलिसोपमध्ये पदार्पण केल्यानंतरही त्याच्या नावाला वलय मिळालेले नव्हते. त्यासाठी त्याला एकता कपूरच्या “पवित्र रिश्ता’ मालिकेची वाट पाहावी लागली. प्रत्येक अभिनेत्याला अशा कसोटीतून जावेच लागते तरच त्याच्या अभिनयाची उंची जाणकारांच्या लक्षात येते. या मालिकेद्वारे सुशांत देशभरात नावाजला गेला. त्याच्या अभिनयाचीही चर्चा झाली. “काय पो छे’ या चित्रपटाद्वारे त्याने मायानगरीत पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले व त्याच्यावर स्टार असा शिक्काही बसला.
“शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातही त्याने केलेल्या भूमिकेची चर्चा झाली. मात्र, प्रत्येक अभिनेत्याला त्याचा एखाद्या चित्रपट मास्टरपीस म्हणून मिळतो किंवा स्टारडम मिळवून देत असतो. तसाच सुशांतला “एम. एस. धोनी- अ अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाची वाट पाहावी लागली. या एका चित्रपटाने कमाईचे विक्रम उभे केले व “सौ करोड क्लब’मध्ये त्याने एन्ट्री केली. शाहरुख, सलमान व अमीर या खान मंडळींचीच मक्तेदारी असलेला हा “सौ करोड क्लब’ सुशांतनेही गाजवला.
भारतीय क्रिकेट संघाचा बेस्ट फिनिशर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या चित्रपटात सुशांतने साक्षात धोनीच उभा केला. धोनीचा फेव्हरेट “हेलिकॉप्टर शॉट’ शिकताना सुशांतची दमछाक झाली होती. निवड समितीचे माजी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू किरण मोरे यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवून सुशांतने धोनीच्या खेळीतील बारकावे, सवयी, लकबी शिकून घेतल्या. त्यासाठी त्याने धोनीच्या अनेक खेळींचे रेकॉर्डिंग पाहिले.
धोनीची हेअर स्टाइल, त्याची बॅट धरण्याची पद्धत, सामन्यातील परिस्थितीनुसार बदलणारे चेहऱ्यावरचे हावभाव सुशांतने नेमके टिपले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा क्रिकेटप्रेमींना सुशांतच्या अभिनयाविषयी शंका होती. मात्र, त्याने धोनीची भूमिका जिवंत केली. भारतात क्रीडापटूंवर बायोपीक अनेक आले आहेत. मात्र, धोनी चित्रपटाच्या माध्यमातून एका यशस्वी खेळाडूला किती अफाट मेहनत करावी लागते हे दिसून आले. या चित्रपटाचे गारुड धोनीच्याच जन्मस्थानी म्हणजेच रांचीत अनेक महिने टिकून होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुशांत देशभर फिरला होता. या प्रत्येक ठिकाणी त्याला जणू धोनीच आहे, असे समजून माध्यमांचे प्रतिनिधी तसेच चाहते प्रश्न विचारताना दिसले. हेच या चित्रपटाचे व सुशांतच्या संयत अभिनयाचे कौतुक आहे.
इतके की खुद्द धोनीच्या वडिलांनीही सुशांतचे तोंडभरून कौतुक केले होते. हिंदी चित्रपटसृष्टीचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही या भूमिकेसाठी सुशांतचे खास पत्र पाठवून अभिनंदन केले होते, यातच सर्वकाही आले.
या चित्रपटानंतर सुशांतसाठी चित्रपटसृष्टीत रेड कार्पेट टाकले गेले नसते तरच नवल. सोन चिडियॉं, छिछोरे आणि केदारनाथ या चित्रपटांतील त्याच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या. अमिताभच्या सत्तरी पार केलेल्या वर्चस्वात आणि खान मंडळींच्या मक्तेदारीतही सुशांतने आपला वेगळेपणा सिद्ध केला. त्याची कारकीर्द आता कुठे स्थिरावत चालली होती. त्याच्या नावामागे वलयही तयार होत होते, पण टोकाचा निर्णय घेत त्याने डाव अर्ध्यावरच सोडला व एक्झिट केली.
चित्रपटसृष्टी व त्यातील व्यक्ती यांच्याबाबत जनसामान्यांना प्रचंड आकर्षण असते. यात आपली कारकीर्द घडविण्यासाठी रोज हजारो युवक-युवती मायानगरीत येतात. काहींना यश मिळते तर काहींची दिशा चुकते. जेव्हा एखादा अभिनेता यशोशिखरावर असतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत. उच्चभ्रू लोकांमधील वावर, उच्च राहणीमान, विविध सवयी यश मिळत असताना सुरू राहतात. मात्र, जेव्हा नैराश्याचा सामना करण्याची वेळ येते तेव्हा भल्याभल्यांना तग धरणे कठीण जाते.
याच नैराश्यातून व्यसनांच्या आहारी जाऊन अनेकांनी आपली कारकीर्द संपवली आहे. मात्र, सुशांतची कारकीर्द तर इतक्यात सुरू झाली होती. वयही तसे एक्झिट घेण्याचे नव्हते. मात्र, नियतीचा खेळ कसा होतो याचा अंदाजही लावणे कठिण असते. आता सुशांत तर डाव अर्ध्यावर सोडून गेला मात्र, असंख्य प्रश्न मागे ठेवून गेला आहे. येत्या काळात या प्रश्नांची उत्तरे मिळतीलही पण त्याने प्रश्न सुटणार नसून नवे प्रश्नही निर्माण होणार आहेत. त्याच्यासह विविध मालिका व चित्रपटांत काम केलेल्या कलाकारांनी सुशांतच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली आहे. खुद्द धोनीनेही धक्कादायक घटना असा उल्लेख केला आहे.
सुशांतच्या स्वियसचिवानेही काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. यात खरे काय आणि खोटे काय ते स्पष्ट होईलच पण या निमित्ताने चित्रपटसृष्टीचा दुसरा चेहरा समोर येत आहे हे महत्त्वाचे. सुशांतने राहत्या घरी मित्रांच्या संगतीत असतानाही एका खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. असे काय घडले होते की त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
यशोशिखरावर असताना सुशांतची आत्महत्या त्याच्या कुटुंबियांनाच नव्हे तर अनेकांना धक्का देऊन गेली आहे. करोनाच्या परिस्थितीमुळे काम बंद झाले किंवा मिळेनासे झाले अशी शक्यता वर्तवली गेली असली तरी त्यात तथ्य किती ते लवकरच स्पष्ट होईल. कर्करोग झाल्यामुळे ऋषी कपूर व इरफान खान यांचा मृत्यू धक्कादायक होता तरी अपेक्षितही होता; पण सुशांतचा मृत्यू चटका लावून गेला. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक गुरुदत्त व दिव्या भारती यांच्याप्रमाणेच सुशांतची एक्झिटही मोठे प्रश्नचिन्ह उभे करून गेली आहे, हे मात्र निश्चित.