अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने स्वतः आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली होती. याबाबत त्याने 14 सप्टेंबर 2016 रोजी स्वतः ट्विट करत आपल्या 50 स्वप्नांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्याने 12 स्वप्नांना गवसणी घालून 38 स्वप्नं अपूर्ण ठेवत निरोप घेतला.
सुशांत सिंह राजपुतने केवळ 50 स्वप्नं पाहिलीच नाही, तर त्यातील अनेक स्वप्न पूर्ण देखील केली. त्याने आपल्या 50 स्वप्नांपैकी जवळपास 12 स्वप्न पूर्ण केली. जेव्हा जेव्हा त्याने आपले स्वप्न पूर्ण केले, तेव्हा त्याने ट्विटरवर याची माहिती देत ट्विट केले. या प्रत्येक ट्विटमध्ये त्याने माझी स्वप्न जगत आहे आणि माझ्या स्वप्नांवर प्रेम करत आहे, हॅशटॅगही वापरले.
सुशांतने आपल्या यादीत प्रवास, खेळ, साहस, कौशल्ये, सामाजिक काम, जुन्या ठिकाणांना भेटी अशा अनेक प्रकारच्या स्वप्नांचा आपल्या यादीत समावेश केला होता. यात त्याचं पहिले स्वप्न विमान चालविण्याचे होते. त्याचं दुसरं स्वप्न जागतिक दर्जाच्या “आयर्नमॅन ट्रायथॅलॉन’ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे होते. ही जगातील सर्वाधिक कठीण मॅरेथॉन समजली जाते. यात एकाच वेळी एकामागोमाग पोहणे, सायकल चालवाणे आणि धावावे लागते. त्याने आपल्या यादीतील ही दोन्ही स्वप्न पूर्ण केली होती.
सुशांत मुळात उजवा होता. मात्र, त्याला डावखुऱ्या फलंदाजाप्रमाणे क्रिकेट खेळायचे होते. हे त्याचे तिसरे स्वप्न होते. यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांचा समावेश होता. त्याने आपले हेही स्वप्न पूर्ण केले. त्याला समुद्रातील ब्लू होलमध्ये देखील पोहायचे होते. त्याने आपले ते स्वप्न देखील पूर्ण केले. यानंतर त्याने थेट आपले बारावं स्वप्न पूर्ण केले. हे स्वप्न होतं त्याचं जुनं कॉलेज असलेल्या दिल्ली तांत्रिक विद्यापीठाला (दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) भेट द्यायचे. याप्रमाणे त्याने एक दिवस अचानक कॉलेजला भेट दिली.
सुशांत चित्रपटात काम करत असला तरी देखील त्याला तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन याची मोठी गोडी होती. त्यामुळेच त्याने गॉड पार्टिकलसह अनेक मोठे शोध लावलेल्या लार्ज हॅड्रोन कॉलायडरलाही भेट दिली. येथे उर्जा कणांची टक्कर घडवून आणण्यासाठी बनवलेले जगातील सर्वात मोठे मशिन आहे.
सुशांत सिंह राजपुतने आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली. मात्र, त्याने त्यातील केवळ 12 स्वप्नं पूर्ण केली. उर्वरीत 38 स्वप्नं पाहण्याआधीच त्याने आपला प्रवास संपविला. त्याने आपल्या स्वप्नांपैकी शेवटचे स्वप्न 15 ऑक्टोबर 2019 रोजी पूर्ण केले होते. त्यानंतर मात्र, त्याने या 50 स्वप्नांच्या यादीतील स्वप्नं पूर्ण करण्याविषयी ट्विट केले नाही.