शिरूर-हवेलीत तिरंगी लढत नक्‍की

भाजपकडून पाचर्णे, राष्ट्रवादीकडून पवार निश्‍चित : प्रदीप कंद यांच्या भूमिकेकडे लक्ष

न्हावरे -शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांकडून विधानसभेच्या उमेदवारी जवळपास जाहीर झाल्या असून, भाजपकडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवेली तालुक्‍यात महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर केली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी आमदार अशोक पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सूतोवाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात येत आहेत.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून आमदार पाचर्णे विरुद्ध माजी आमदार पवार यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे. असे असले तरी, भाजपा-सेना युतीच्या भवितव्यावर तिसरा उमेदवार कोण? ते ठरणार आहे. भाजपाकडून आमदार पाचर्णे यांना त्यांच्या पक्षातून कोणीही प्रतिस्पर्धी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे आचारसंहितेअगोदरच आमदार पाचर्णे यांनी प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही प्रचारास जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार बाबुराव पाचर्णे हे भाजपाचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार राष्ट्रवादीचे उमेदवार तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद अपक्ष किंवा सेनेचे उमेदवार असे चित्र आगामी काळात दिसले तर याचे आश्‍चर्य वाटणार नाही.

कंद यांचं ठरलंय!
माजी आमदार अशोक पवार यांचा प्रचार राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सुरू आहे. तर जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा प्रचार “एकटा चलो रे’ अशा पद्धतीने मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात युतीमध्ये बिघाडी झालीच तर कंद हे शिवसेनेचे उमेदवार असतील असाही तर्क राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. याला कारणही तसेच आहे, कंद यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात “आता आमचंही ठरलंय’ या शीर्षकाखाली फ्लेक्‍सयुद्ध सुरू आहे. त्या फ्लेक्‍सवर राष्ट्रवादीचा कोणीही नेता दिसून येत नाही. त्यामुळे ‘आता आमचंही ठरलंय’ याचा अर्थ सोयीनुसार मतदारसंघातील मतदारांकडून घेतला जात आहे.

अशोक पवारांकडून प्रचारास प्रारंभ
माजी आमदार अशोक पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सणसवाडी येथे आणून पक्षाच्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन एक प्रकारे प्रचाराचा शुभारंभच केला आहे. त्या मेळाव्याला माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)