रांजणगावमधील कंपन्या चीनच्या वाटेवर?

औद्योगिक वसाहतीमधील गुंडगिरी थांबवा : उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

– संभाजी गोरडे

रांजणगाव गणपती – पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वाढती गुन्हेगारी, ठेकेदारी मिळविण्यावरून टोकाचा संघर्ष, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष, राज्य शासनाची चालढकल भूमिका आदी कारणांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्या हतबल झाल्या आहेत. गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुण्यात जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने आक्रमक होत चीनला कंपन्या स्थलांतरित करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मागील आठवड्यात येथील उद्योजक आणि व्यवस्थापनांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले आहे. परंतु अद्याप यावर तोडगा निघत नसल्यामुळे पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीमधील भयछटा गडद होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे घेतले जाते. 250 कंपन्या असून सुमारे 15 ते 20 बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. वाहनउद्योगातील आघाडीच्या कंपन्यांचे उत्पादन रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये घेतले जाते. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील तसेच रांजणगाव परिसराचा कायापालट झाला आहे. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. रांजणगावमधील वसाहतीमुळे परिसराला झळाळी आली असताना त्याचबरोबर गुन्हेगारांनी पाळेमुळे घट्ट रोवली. मोठ्या कंपन्यांतून ठेका मिळविण्यासाठी सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. यातून कंपनी व्यवस्थापनाला धमकावणे, खंडणी वसूल करणे, प्राणघातक हल्ला आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांची वानवा असताना पुन्हा कंपनीवर गुन्हेगारीची पकड मजबूत होत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन हताश झाले आहे.

गेल्या दीड महिन्यांपूर्वी पुण्यात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने तक्रारी आणि समस्यांचा पाढा वाचला होता. तसेच सुविधा देऊन गुन्हेगारी रोखण्याची मागणी त्यावेळी केली होती. या बैठकीत चीनला कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. या बैठकीला आता दीड महिना उलटला तरी प्रशासन ढिम्म बनले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारात दाद मागितली आहे. तिथेही व्यवस्थापनाच्या पदरी निराशा पडण्याची शक्‍यता आहे.

देशभर औद्योगिक क्षेत्रात मंदीची छटा तीव्र आहेत. वाहन उद्योगांतील नोकऱ्यांवर गंडातर येत आहे. लाखों तरूण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. यातील लाखों तरूण वेठबिगाराप्रमाणे वेतन घेत आहेत. त्यात ठेकेदार आणि पुरवठादार यांच्याकडून कंपन्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर कंपनी व्यवस्थापन जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत दाद मागत असताना अद्याप कार्यवाहीचे सोपस्कार झाले नाही. त्यामुळे अस्थवस्था आहे.

पुरवठादार, ठेकेदारांकडून दबावतंत्र
रांजणगाव, चाकण, सुपा एमआयडीसीमध्ये वाहन उद्योग आणि कारखाने आल्यामुळे परिसरामध्ये भरभराट झाली आहे. येथील स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. या भागाचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे या कंपन्यांमुळे कामगार संघटना, कंत्राटी कामगार, कच्चामाल पुरवठादार तसेच इतर अनेक माध्यमातून कंपन्यांना तसेच कंपनी व्यवस्थापनाला वेठीस धरण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू झाले आहेत. त्यामुळे चाकण आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कंपनी व्यवस्थापनाला होत असलेल्या त्रासाबद्दल पाढा वाचला. यावेळी कारखानदारांनी कंपन्या चीन येथे स्थलांतरित करण्यासंबंधी सूतोवाच केले आहे.

कामगारांचे प्रबोधन करणार- वंदना पोटे
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्या समस्यांना सामोरे जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय मीडिया फौंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा वंदना पोटे यांनी कारेगाव येथे बैठक घेऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी कंपन्यांना नाहक त्रास देणाऱ्या घटकांविरोधात आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. कंपनीमुळे रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत. कंपनी कामगारांना हाताशी धरून कंपनीस वेठीस धरणाऱ्या विरोधात कामगार जागृती मोहीम हाती घेणार आहे. काही महिन्यांपासून गुंड लोकांनी कामगारांच्या माध्यमातून कंपन्यांवर दबावतंत्राचा अवलंब केला आहे, असे लोक कामगारांना खोटी सहानुभूती दर्शवत तसेच खोट्या आश्‍वासनांना बळी पडून स्वतःचे खिसे भरण्याचे उद्योग करतात. ही बाब गंभीर आहे. यामध्ये कंपनीचे नुकसान होत आहे. कंपनी बंद पडली तर अनर्थ होऊ शकतो. ही सामाजिक समस्या आहे. याकरिता या घटकांविरुद्ध आंदोलन करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. कामगारांना जागृत करण्यासाठी प्रबोधन, मेळावे, मार्गदर्शन करणार असल्याचे पोटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)