लोणी काळभोर -तरुण पिढीमध्ये ट्रेकिंग करण्याची “क्रेझ’ वाढत आहे. त्यामुळेच लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील उंच डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी दर रविवारी 400 ते 500 युवक, युवती, महिलांची गर्दी होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर पूर्व दिशेला 18 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर गाव आहे. महामार्गापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा आहे. याठिकाणी सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील उंच डोंगर आहे. येथे वाहनाने डोंगराच्या पायथ्याशी जाता येते व लगेच ट्रेकिंगला सुरुवात करता येते. निसर्गरम्य तीर्थक्षेत्र रामदरा व शेजारीच हिरवागार डोंगर यामुळे येथे येणाऱ्या ट्रेकर्सच्या संख्येत गेल्या काही दिवसांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गाच्या सान्निध्यात असलेले रामदरा शिवालय ट्रेकिंग करणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.
आठवड्यातून एक दिवस रामदरा येथील डोंगरात ट्रेकिंग केल्याने संपूर्ण आठवडा आनंदी जातो. शरीरही फिट राहते, असे ट्रेकिंग करणाऱ्यांचे म्हणणे आहे. युवकांनी आठवड्यातून एक दिवस आपल्या शरीरासाठी देऊन येथे ट्रेकिंग करावे यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक शिवाजी ननवरे हे युवकांमध्ये जनजागृती करत असतात. रविवारी बरेच जण आपापल्या कुटुंब, मित्रमंडळी बरोबर या ठिकाणी ट्रेकिंगला येत आहेत. तसेच सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात असलेले रामदरा शिवालय व डोंगर पाहून या ठिकाणी येणाऱ्यांचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.