पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ऊन-वारा-पावसात आसरा देणारे पुणे रेल्वे स्थानकावरील जुने झाड उन्मळून पडले. ही घटना पहाटे साडेसहा वाजता घडल्यामुळे प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे या घटनेत सुदैवाने गर्दी नसल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, अग्निशमन दलाने धाव घेत झाडाच्या फांद्या तोडून परिसर मोकळा केला.
पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य दरवाजाजवळ असलेल्या प्रार्थनस्थळाजवळ हे जुने झाड होते. जवळपास शंभर वर्षांपूर्वीचे हे झाड असल्याचे बोलले जात आहे. सध्या उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामध्ये हे झाड सावली म्हणून प्रवाशांसाठी आसरा बनत असून, दररोज या झाडाखाली अनेक प्रवाशी बॅग घेऊन बसतात. तर काहीजण आराम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही दुर्घटना गर्दीच्यावेळी घडली असती, तर मोठा प्रसंग ओढवला असता.