ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे चाक पुन्हा ‘पंक्‍चर’

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिकांचे हाल : व्यवसाय, अर्थकारण डबघाईला

पुणे/पिंपरी – डीझेल, सर्व प्रकारचे कर, इन्शुरन्सचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ट्रान्स्पोर्ट व्यवसाय अगोदरच अडचणीत आला होता. त्यानंतर आता पुन्हा लॉकडाऊमुळे वाहतूकदारांच्या अर्थचक्राचे “चाक’ संकटाच्या गर्तेत खोलवर रुतले आहे. त्यामुळे हा व्यवसायच डबघाईला आला असून ट्रकमालकांना कर्जाचे हप्ते भरणेही शक्‍य होत नसल्याची बाब समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील उद्योगांना लागणारा कच्चा माल देशाच्या विविध भागातून वाहनांद्वारे शहरात येत आहे. शेकडो ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आहेत. इंधन व करवाढीने हे क्षेत्र अडचणीत आले आहे. त्यात टोलही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पुण्याहून इतर कोणत्याही शहरात किंवा परराज्यांत जायचे असल्यास हजारो रुपयांचा टोल ट्रक चालकांना भरावा लागतो. त्यातच आरटीओ व पोलिसांकडून होणारी अडवणूकही अडचणीत भर घालणारीच ठरते.

पहिल्या लॉकडाउननंतर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी कसेबसे स्वतःला सावरले. पण, कर्जाचे हफ्ते थकीतच होते. त्यातच पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाउन लावले गेले. शहरातील उद्योग सुरू असले तरी अनेक शहरांमधील व्यापारच ठप्प आहेत. त्याचा थेट परिणाम उद्योगांवर आणि पर्यायाने वाहतुकीवर झाला आहे. मालवाहतुकीची परवानगी असूनही मोठ्या प्रमाणावर ट्रक जागेवरच उभे ठेवावे लागले आहेत.

सर्वाधिक अडचण महाराष्ट्रात
दिल्ली, झाशी, आग्रा, मथुरा, ग्वाल्हेरसह देशाच्या अनेक भागांमध्ये वाहतूक व्यवसाय सुरळीत सुरू आहे. केवळ महाराष्ट्रात आणि त्यातही पिंपरी चिंचवडमध्ये अडचणींचा महापूर आला आहे. निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये, शेतकरी आंदोलनामुळे करोना पसरला नाही. हा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाउन टाळून पर्यायी उपाययोजनांवर भर दिला जाण्याची गरज असल्याचे मत ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व्यक्‍त करतात.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या मागण्या
लॉकडाऊन संपुष्टात आणून वाहतूक सुरळीत करा
वाहनांचे हफ्ते दोन वर्षे स्थगित ठेवावे
पेट्रोल – डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे
शासनाने आर्थिक पॅकेज देऊन हातभार लावावा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.