मोठी बातमी! महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन? दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय

मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 1 मे पर्यंत संचाबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. तरी देखील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसते आहे. दररोज करोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली असून मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लाॅकडाऊनबाबत निर्णय घेतील, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत कडक लाॅकडाऊनसंदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तेथे कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
“सध्या संचारबंदीचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाउन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाउन 100 टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,” असे वडेट्टीवर म्हणाले.

“करोनाच्या दुसऱ्या लाटेने अंदाज चुकवला आहे. सगळ्यांनाच वाटत होतं की ही दुसरी लाट सौम्य असेल, पण ती तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती, असेही वडेट्टीवार म्हणाले. तसेच दिल्लीतील लाॅकडाऊन कसा आहे, नियमावली काय आहे यावर चर्चा करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांना काय सूट आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतलेला आहे? लाॅकडाऊनचं स्वरूप कसं आहे? या सर्व बाबींचा आम्ही विचार करतो आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

– करोनाविरूद्धच्या लढाईसाठी 5500 कोटी रुपये राखीव

करोनाविरूद्धच्या लढाईसाठी ठाकरे सरकारने साडेपाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. कोविड रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणे, रेमडेसिवीर, ऑक्सिजन प्लांट, बेड्स वाढवणे या सर्वांसाठी 3300 कोटी आणि आमदारांना एक कोटी त्यांच्या निधीतून खर्च करायचा आहे, याशिवाय इतरही स्त्रोत आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

– केंद्राने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत

केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी 1200 कोटी रुपये दिले होते. माग्या 3 एप्रिल रोजी पैसे आले होते. पण आज 19 एप्रिल असून अद्यापही ते पैसे आलेले नाहीत. यावेळी उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून 1600 कोटी रुपये येणे अपेक्षित असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.