पुणे – ज्येष्ठ नागरिकाला बॅंक दुसऱ्या बॅंकेत विलीन होणार असल्याचे सांगत बॅंक खात्याची सर्व माहिती घेऊन 1 लाख 86 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदनगर येथे एका 76 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनूसार त्याला एका व्यक्तीचा फोन आला होता. समोरील व्यक्तीने बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेतून बोलत असल्याचे सांगत तुमची बॅंक विजया बॅंकेमध्ये विलीन होणार आहे. यांमुळे तुमची क्रेडीट कार्ड बंद होण्याची शक्यता आहे.
ती सुरु ठेवायची असल्यास बॅंक खात्याची सर्व माहिती द्या असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादींनी बॅंक खात्याची सर्व माहिती दिली. यानंतर सायबर भामट्याने त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 86 हजार 900 रुपये ऑन लाईन वर्ग करुन घेतले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे करत आहेत.