निमसाखर -निमसाखर (ता. इंदापूर) ते पळसमंडळ (ता. माळशिरस) पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमेवरच्या बंधाऱ्यावरील रस्त्यावर नागरिकांकडून जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने यांची गंभीर्याने दखल घेऊन हा रस्ता बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पुणे जिल्ह्यातील निमसाखर तर सोलापूर जिल्ह्यातील बांगार्डे, पळसमंडळ भागातून पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात छुप्या मार्गाने आवक-जावक होत आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीमधून छुप्या पद्धतीने दोन्ही भागातील ग्रामस्थ ये-जा करत असतात
.त्याचबरोबर दुचाकीवरूनही या भागातील बंधाऱ्यावरुन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत आहे. यापूर्वी पळसमंडळ बंधारा भागात रस्ता खोदून तर बंधाऱ्यावर काटेरी झुडपे टाकुन रस्ता बंद केला होता. मात्र काही दिवसातच हा रस्ता पुन्हा सुरु झाला आहे.
सध्या निमसाखर, निरवांगी आदी परिसरात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या रस्त्यावरून जिल्हाबंदी असल्याने वाहतूक करणे शक्य नसल्याने या नदीपात्रातून दुचाकीवरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जिल्हाबंदी असली तरी प्रशासनाचा डोळा चुकवून नीरा नदीपात्रातून छुप्या पद्धतीने जिल्हाबंदीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील छुप्या पद्धतीने होणाऱ्या वाहतूकीला प्रशासनाने लगाम लावणे गरजेचे आहे.