आयपीएलपासून क्रिकेटला धोका!- प्रक्षेपणावर बंदीचे पाकिस्तानकडून समर्थन

इस्लमाबाद – सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमुळे ( आयपीएल 2019) देशातील क्रिकेटला धोका निर्माण होत असल्याचा अजब दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानातील आयपीएल प्रक्षेपणच बंद केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दिली.

ते म्हणाले,”पाकिस्तानातील क्रिकेटला धोका पोहचवण्याचा भारताकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे ही लीग पाकिस्तानात दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आयपीएलचे प्रक्षेपण येथे करण्यात येणार नाही. पुलवामा हल्ल्‌यानंतर भारतात पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. त्याने त्या लीगला आणि क्रिकेटला फटका बसला.”
14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्‌यानंतर भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. त्यांच्या भावनांचा आदर करताना भारतातील पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. त्यावेळी चौधरी यांनी नाराजी प्रकट केली होती आणि पाकिस्तानात आयपीएल न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच क्रिकेट आणि राजकारण हे वेगवेगळे ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो, असा दावाही त्यांनी केला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.