पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी आज (दि.13) दुपारी तीनपर्यंत ‘पुणे बंद’ची हाक दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा दिला असून मोर्चामध्येही सहभागी होणार आहे.
दरम्यान, पुणेबंदमुळे शहरातील वाहतूक मार्गही बदलले गेले आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी या बदलांबद्दल एकदा माहिती घेणं आवश्यक आहे. सकाळी दहा वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा खंडोजीबाबा चौक-टिळक चौक-लक्ष्मी रोडने बेलबाग चौक येथून लाल महाल येथे जाणार आहे. त्यानंतर लाल महाल येथे सभेने समारोप होणार आहे.
यामुळे या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. तर जाणून घेऊयात यामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत…
शिवाजी रोड – स.गो. बर्वे चौक
बाजीराव रोड – पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
गणेश रोड – फकडे हौद चौक ते जिजामाता चौक
केळकर रोड – आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक
तर दुसरीकडे यावेळी काही ठराविक दुकाने चालू असणार आहेत, जसे की… पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने हे सुरू राहणार आहेत. तर, पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली असल्याचं सांगण्यात आलं आहे.