पुणे – चांदणी चौक येथे उड्डाण पुलाच्या गर्डर उभारणीसाठी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 जुलै ते दि. 15 जुलै 2023 या कालावधीत रात्री 12.30 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त (वाहतूक) विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.
चांदणी चौकात एकात्मिक संरचना पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, ते अंतिम टप्प्यात आहे. एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे (व्हेहीक्युलर ओव्हर पास-व्हीओपी) काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून, सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने हा वाहतूक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक कदम यांनी दिली. चांदणी चौक येथे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून सुरू राहणार आहे.
या कालावधीत फक्त मल्टी ऍक्सेल वाहनांची वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात येणार आहे. ही वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणी थांबवली जातील व साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवली जाणार आहेत.
वाहतुकीचा खोळंबा होणार नाही…
- या कालावधीमध्ये मुख्य महामार्गावरील वाहतूक बंद करणार.
- हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील.
- मुंबईकडून सातारा अथवा कोथरुडकडे जाण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प-6 चा वापर करतील.
- सातारा व कोथरूडमार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर करता येणार.
- इतर वाहतुकीत कोणताही बदल नाही. त्यामुळे कुठलीही वाहतूक थांबणार नाही.