पुणे – जिल्ह्यातील ९३३ पेक्षा कमी लिंगगुणोत्तर असलेल्या ६६९ ग्रामपंचायती या रेड झोनमध्ये आहेत. यामधील गावांमध्ये सातत्याने जनजागृती आवश्यक आहे. जिल्ह्यात मुलगी वाचवा मुलगी शिकवा या योजनेअंतर्गत सर्व यंत्रणेने सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच बाल लिंग गुणात्तराचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
याबाबत जिल्हा कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जि. प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिरासे यांच्यासह जिल्हा कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजनेअंतर्गत स्वाक्षरी फलकाचे अनावरण डॉ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजनेअंतर्गत मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही, मी मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी संपूर्ण सहकार्य करीन’ अशा आशयाचा हा स्वाक्षरी फलक सर्वांना स्वाक्षरीसाठी उभारण्यात आला होता.
निवासी उपजिल्हाधिकारी कदम म्हणाल्या, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागामार्फत सर्वेक्षण करावे.
राष्ट्रीय स्तरावरील बाल लिंग गुणोत्तरापेक्षा कमी प्रमाण असलेल्या ग्रामपंचायती शोधून त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबवावेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी यंत्रणांनी ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जनजागृतीसाठीच्या विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.