पुणे – बकरी ईदनिमित्त आज (गुरुवारी) गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या सामूहिक नमाज पठणानिमित्त चौकातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी सहापासून पठणाची सांगता होईपर्यंत बदल केले आहेत, असे वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.
मम्मादेवी ते ढोले पाटील चौक दरम्यान वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल. स्वारगेटकडे जाणारा मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी चौकातून सीडीओ चौक येथून गिरीधर भवन चौकमार्गे ढोले पाटील चौकातून इच्छितस्थळी जावे. सीडीओ चौकातून येणारी वाहतूक सकाळी अकरापर्यंत बंद राहील. लुल्लानगरकडून खाणे मारुती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौकातून वानवडी बाजार चौकाकडे जावे.
गिरीधर भवन चौकातून लष्कर भागाकडे येणाऱ्या वाहनांनी नेहरु रस्त्याने इच्छितस्थळी जावे. ढोले पाटील चौक ते गोळीबार मैदान चौक वाहतूक बंद राहील. भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा भागातून गोळीबार मैदानाकडे जाण्यास जड वाहनांना मनाई केली आहे.