पुणे – शहरातील पथारी व्यावसायिकांना महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्न पदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक व्यावसायिक बेकायदेशीर सिलिंडर वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. तसेच, व्यावसायिकाला सिलिंडर देणाऱ्या वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
या कारवाईबाबत व जगताप यांच्या नियंत्रणाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेकडून आतापर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करताना सिलिंडरचा वापर करतात, अशा व्यावसायिकांवर 1021 सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
शहरात बंदी असतानाही तसेच महापालिकेकडून कार्यवाही सुरू असतानाही अनेक जण सिलिंडर वापरतच असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करत असताना आढळून आल्यास अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करून तसेच संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.