कांदा, लसूण चोरीने व्यापारी भयभीत

तळेगाव दाभाडे  – तळेगाव-चाकण मार्गालगत (सिद्धार्थ नगर) येथील छत्रपती भाजी मार्केटमध्ये गुरुवारी (दि. 31) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमधील 200 किलो कांद्यासह, एक हजार रुपयांची नाणी, लसूण व आले असा एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पसार झाले.

ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या, कांदा भाव खात असल्याने कांदा, लसूण व आले व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दाभाडे शहरात कांदे चोरीच्या घटनेची परिसरात चर्चा सुरु होती. वसंत बबन भोकसे (वय 38 रा. वराळे, ता. मावळ मूळ कुरकुंडी ता. खेडे) यांनी फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषद हद्दीतील तळेगाव-चाकण मार्गालगत (सिद्धार्थ नगर) येथे नव्याने छत्रपती भाजी मार्केट सुरू झाले आहे. या ठिकाणी सुमारे शंभर भाजी विक्रेते आहे. गुरुवारी (दि. 31) वसंत भोकसे, शिवाजी मराठे, गणेश वाळूंज, दादाभाऊ डावरे, जाकीर मुजावर, बंटी चेतवाणी, किसन बुरुटे, महादू कांबळे, मुन्ना शेख, राजू कार्ले या भाजी विक्रेत्यांच्या दुकानातून 5 ते 10 रुपयांची नाणी एकूण हजार रुपये, 200 किलो कांदा किमंत 8,000 रुपये, 110 किलो लसूण किंमत 16,500 रुपये, 20 किलो आले किंमत 2,000 एकूण 27,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नीलेश बोकेफोडे व संदीप गाडीलकर, तसेच कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.