तिरुवनंतपुरम : पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये सर्वात इमानदार प्राणी म्हणून नेहमीच श्वानाकडे पाहिले जाते आणि कुत्र्यांच्या इमानदारीबाबत अनेक कहाण्याही सांगितल्या जातात. आता एक आधुनिक कहानी समोर आली असून आपल्या मृत मालकाच्या प्रतीक्षेत एका श्वानाने गेले चार महिने एका रुग्णालयाच्या शवागाराच्या बाहेर मुक्काम ठोकला असून आपला मालक कधी बाहेर येत आहे याची वाट हे श्वान पाहत आहे.
केरळमधील कुंन्नूर जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला असून या रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना हे श्वान कोणाची वाट पाहत आहे हे समजत नाही. कारण चार महिन्यापासून हे श्वान या शवागाराबाहेरच घुटमळत आहे. त्यामुळे या गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्या व्यक्तीसोबत हे श्वान आले होते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता याची माहिती व्यवस्थापनाला उपलब्ध होत नाही.
पण शवागारा बाहेर असलेल्या रॅम्पच्या ठिकाणी हा श्वान वाट पाहत असल्यासारखा बसून असतो चार महिन्यापूर्वी जेव्हा पहिल्यांदा काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी या श्वानाला खाण्याच्या काही गोष्टी दिल्या पण त्याने त्याला तोंडही लावले नाही पण नंतर जेव्हा या श्वानाचा कर्मचाऱ्यांवर विश्वास बसला तेव्हा तो हळुहळु त्यांनी दिलेले खाणे खाऊ लागला .
आता मात्र हा श्वान या परिसरात रुळला आहे पण त्याचा सर्वात जास्त मुक्काम शवागारबाहेर असलेल्या रॅम्पच्या ठिकाणीच असतो आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येक प्रेताकडे त्याची नजर असते या कुत्र्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला रामू असे नाव दिले आहे.
खरे तर या रुग्णालयामध्ये मृत देह आत नेण्यासाठी एक दरवाजा असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी दुसरा दरवाजा आहे त्यामुळे कदाचित रामूचा मालकाला दुसऱ्या दरवाजाने कधीच बाहेर काढले गेले असण्याची ही शक्यता आहे. त्याची कल्पना रामूला नसल्यामुळे तो प्रमाणिकपणे आपल्या मालकाची वाट पहात रॅम्पपशी बसून असतो. केरळच्या आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी मध्यंतरी या रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांनाही या कुत्र्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले.