पुणे – पोलीस अधिकारी असल्याचे सांगत आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयास गुन्हेशाका युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले. संबंधीत आरोपीने पनवेल येथील एका व्यक्तीची कार विकण्याच्या बहाण्याने फसवणूक केली होती.या गुन्हयासंदर्भात आरोपीचा माग काढत असताना तो पथकाला सापडला. त्याची चौकशी करत असताना त्याने आपण सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत पथकाला धक्का-बुक्की केली. त्याला पोलिशी खाक्या दाखवताच तो बोगस पोलीस अधिकारी असल्याने निष्पन्न झाले. त्याने पनवेल तसेच नवी मुंबईत अनेकांना पोलीस असल्याचे सांगत गंडा घातला आहे.
सिध्देश्वर सुभाष नागरे(33,रा.प्राईम कॉर्नर प्लॉट,,सेक्टर आर.पुष्पकनगर,पनवेल,जि.रायगड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युनिट सहाचे पथक हद्दीमध्ये गस्त करित असताना त्यांना खबर मिळाली की, एका इसमाने त्याच्याकडील स्विफ्ट कार विकण्याचा बहाणा करून पनवेल,नवी मुंबई येथील इसम नामे आनंद पाटील यांची आर्थिक फसवणूक करून तेथून पलायन केले आहे. तो सध्या आव्हाळवाडी,वाघोली येथे राहावयास आलेला आहे. त्यानूसार पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता,त्यांना त्याठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट कार मिळून आली. तिचा क्रमांक हा चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले व त्या कारच्या डॅश बोर्डवर पोलीस अशी लिहलेली पाटी मिळून आली. गाडी मालक सिध्देश्वर नागरे यास पोलीस पथकाने ओळख सांगून त्याचे नाव पत्ता विचारता “तुम्ही मला नाव विचारणारे कोण? मी पुणे पोलीस दलामध्ये ए.पी.आय. आहे”
असे बोलून त्याने पोलीस पथका सोबत धक्का-बुक्की करून दमदाटी केली. यामुळे त्यास कार्यालयामध्ये आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता,त्याने पोलीस दलामध्ये कार्यरत नसल्याचे त्याने सांगितले. तो राहावयास असलेल्या फ्लॅटच्या मालकाकडे चौकशी केली असता त्यांनादेखील त्याने पोलीस असल्याचे सांगून भाडेकरू बाबत करारनामा केला नाही व त्यांना घरभाडे देखील दिलेले नसल्याचे सांगितले तसेच घराच्या शेजारील भाजी विक्रेत्यास देखील पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडून पैसे न देता भाजी घेवून गेल्याचे भाजी विक्रेत्याने सांगितले. तपासात त्याने पनवेल,नवी मुंबई
येथे देखील दोन ते तीन जणांना पोलीस असल्याचे सांगून,त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे.