औंधमध्ये तुफान राडा; एकाचा खून

चौघे गंभीर, अन्य 5 जण जखमी : दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे  – औंध येथे दोन गटांत शुक्रवारी रात्री तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका रिक्षाचालकाचा कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आला. तर इतर तीन ते चार व्यक्‍ती गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केल्या आहेत. त्यानुसार खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले आहेत.

रफीक लाला शेख (वय 27, रा. चंदन सोसायटी, नागरस रोड, औंध) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रफीकच्या भावाने फिर्याद दिली आहे. यानुसार, “जुन्या भांडणाच्या कारणावरून हर्ष इमारतीजवळील मांडवाबाजूला इम्रान शेख, शुभम भिसे, उमेश धर्मेंद्र, इरफान शेख, युसूफ शेख (सर्व, रा. औंध) यांनी तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी रॉड याने फिर्यादीचा भाऊ रफीक याच्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. रफीकला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले.

तर युसूफ हुसेन शेख (वय 50, रा. औंध) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, “फिर्यादी व त्यांचा मुलगा इरफान, इम्रान आणि त्याचे मित्र शुभम व उमेश हे इमारतीजवळ उभे असताना रफीक शेख, शफीक शेख आणि नावेद शेख हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादीची मुले आणि त्यांच्या मित्रांवर लोखंडी कोयते आणि रॉडने प्राणघातक हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-4चे उपायुक्त, खडकी विभागाचे सहायक पोलीस उपायुक्त बोराटे, सहायक पोलीस उपायुक्त (वाहतूक) गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, एस. डी. पवार, माळेगावे आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

कोयत्यांची विक्री थांबणार कशी?

बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत तरुणाचा तलवारीने वार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता औंधमध्ये खुनाची घटना घडली आहे. पोलिसांनी कोयते विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये कोयत्यांचा वापर होत आहे. त्यामुळे कोयता विक्रीस आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर, औंध येथील घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव आणि भीतीचे वातावरण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.