अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा

 पुणे – जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरांतील अपघातांची संख्या घटली आहे; परंतु या कालावधीमध्ये सुमारे 33 गंभीर अपघात अवजड वाहनांमुळे झाल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

वाहतूक पोलिसांकडून सुरक्षित वाहतुकीसाठी घालून देण्यात आलेले नियम वाहनचालकांकडून धाब्यावर बसवण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये जड वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे.

भरधाव डंपरचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडले आहेत. विमाननगर भागासह पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना पीक अव्हर्स दरम्यान प्रवेश बंदी केलेली आहे. मात्र, पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता वाहने आत आणणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. प्रवेशबंदीची वेळ झुगारून या भागातून जाणाऱ्या आठ डंपरचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख 70 हजार 700 रूपयांचा दंड वसूल केला आहे. तर जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ट्रकमुळे सुमारे 21 आणि डंपरमुळे सुमारे 12 अपघात झाले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे

नियमांचे उल्लंघन करत ट्रक आणि डंपर आदी अवजड वाहने चालवणाऱ्यांनी वेगमर्यादेचे पालन करावे. यासह प्रवेशबंदीबाबत पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. पुढील काळामध्ये देखील वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक (नियोजन) शुभदा शितोळे म्हणाल्या. 

Leave A Reply

Your email address will not be published.