महाबळेश्‍वरच्या सभेत नगराध्यक्ष व त्यांच्या पतींना धरले धारेवर

सत्ताधारी नगरसेवक आक्रमक; नगराध्यक्षांना घ्यावी लागली सपशेल माघार

महाबळेश्‍वर – पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाच्या अनेक सदस्यांनी नगराध्यक्षा व त्यांच्या पतींना धारेवर धरले. सत्ताधारी नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नगराध्यक्षांना काही वेळा सपशेल माघार घ्यावी लागली. त्यात मागील सभेतील बोटी खरेदी करण्याच्या विषयांवरून नगराध्यक्षांचे पती कुमार शिंदे व नासीर मुलाणी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली.

त्यात दोघांच्या पत्नींनीही उडी घेतल्याने सभेतील वातावरण चांगलेच तापले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाचाबाची, गोंधळ, आरोप प्रत्यारोप ही नित्याची बाब झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही याचा प्रत्यय आला. 11 जुलै रोजी झालेल्या सभेत विषय पत्रिकेत 50 विषय होते. यापैकी 34 विषयांवर चर्चा झाली.

याच दिवशी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कार्यक्रम असल्याने सभा तहकूब करण्यात आली. उरलेले विषय नंतर घेतले जातील, असे नगराध्यक्षांनी जाहीर केले. परंतु त्यानंतर तहकूब सभा पूर्ण झाली नाही. उरलेल्या विषयांवर नगराध्यक्ष, त्यांचे पती व मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेऊन सभा पूर्ण केली. तहकूब सभा कधी होणार याची नगरसेवक वाट पाहात असताना त्यांच्या हाती नवीन सभेची नोटीस पडली.

मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा पहिला विषय होता. पालिकेत अशा प्रकारे परस्पर सभा पूर्ण करण्याचे धाडस कोणत्याही नगराध्यक्षांनी केले नव्हते. परंतु, या नगराध्यक्षांनी मनमानी कारभाराचा कळस केला. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांमध्ये संतापाचे वातावरण होते. याचे पडसाद सभेत उमटले.
संदीप साळुंखे यांनी मागील सभा पूर्ण झाल्याशिवाय दुसरी सभा कशी घेतली, असा सवाल करून 11 जुलैची सभा पुढे सुरू करण्याची मागणी केली.

इतर नगरसेवकांनीही मागील सभा घेण्याचा आग्रह धरला. परंतु, मागील सभा पूर्ण झाली आहे, आता नवीन सभा होणार, असा पवित्रा नगराध्यक्ष व त्यांचे पतींनी घेतल्याने गोधळाला सुरूवात झाली. उपनगराध्यक्ष अफजल सुतार, युसूफ शेख, प्रकाश पाटील, रवीद्र कुंभारदरे, नासिर मुलाणी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने नगराध्यक्षांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला. त्यांनी मागील सभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची सूचना प्रशासनाला केली.

मागील सभेतील बोटी खरेदी करणे या विषयावर चर्चा सुरू झाल्यावर याविषयी सर्वसाधारण सभेत कोणताही निर्णय झाला नसताना बोटी खरेदी करण्याची निविदा कशी काय प्रसिध्द झाली, असा सवाल संदीप साळुंखे यांनी केला. या विषयावर स्थायी समितीमध्ये निर्णय झाला आहे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्षांच्या पतींनी केले.

उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने पुन्हा गोंधळ झाला. जेटी खरेदीचा विषय नासिर मुलाणी यांनी लावून धरल्याने नगराध्यक्षांच्या पतींचे पित्त खवळले. त्यांनी मुलाणी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. तेव्हा मुलाणी यांनीही कुमार शिंदे यांचेवर प्रतिहल्ला चढवला. या चर्चेत मुलाणी व शिंदे यांच्या पत्नींनेही सहभाग घेतल्याने गोंधळ उडाला. अनेक नगरसेवक उभे राहून आरोप करत होते. चर्चेत अफजल सुतार, युसूफ शेख, रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, संजय पिसाळ, प्रकाश पाटील यांनी भाग घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.