अभिनेता सयाजी शिंदेंकडून ‘त्या’ वक्‍तव्यावर दिलगिरी व्यक्त

मुंबई : राज्य सरकारने सुरू केलेला वृक्ष लागवडीचा उपक्रम हा केवळ थोतांड असल्याचे वादग्रस्त विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी केले होते. आता याच विधानावर सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्‍त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रागाच्या भरात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो’ असं शिंदे यांनी व्हॉट्‌सऍप मेसेजच्या माध्यमातून म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हे केवळ नाटक आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. या वृक्ष लागवडीवरुन भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते असं विधान अभिनेता सयाजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र केलेल्या विधानाबाबत आता सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रशांत जामोदे हे ग्रामसेवक राज्य सरचिटणीस आहेत. त्यांना सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त करणारा एक मेसेज पाठवला आहे. ‘ग्रामसेवक मित्रांनो एका ठिकाणची परिस्थिती पाहून रागाच्या भरात मी एका वाहिनीवर प्रतिक्रिया दिली. त्यातून ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. आपण सगळे उत्तम काम करता. यापुढे कधीच शासकीय कर्मचारी आणि व्यवस्थेवर बोलणार नाही. तुम्ही एकदा म्हणाला मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे काम अप्रतिम आहे. माझ्या बोलण्यात गडबड झाली. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा!’ असा मेसेज करून सयाजी शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.