खासदार उदयनराजे; धाकट्या भावाला मदत करावीच लागेल
सातारा – साताऱ्यातील विकास कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच झाली. राजकारणाच्या पलीकडे त्यांची आणि माझी मैत्री आहे. त्यामुळे आगामी काळात लोकांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत धाकट्या भावाला मदत करावीच लागेल, असेदेखील उदयनराजे यांनी सांगितले.
उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाबाबत जोरदार चर्चा होती. त्याबाबत पत्रकारांनी उदयनराजे यांच्यांशी संवाद साधला.
त्यावेळी उदयनराजे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ विकास कामांसाठी होती. बाकी तर्कवितर्क तुम्ही काढू शकता. भाजप प्रवेशाचे वावटळ उठले असेल तर चांगलेच आहे. कारण, प्रत्येक पक्षात माझे मित्र आहेत. त्यांच्याशी वैयक्तीक संबध आहेत. त्यामुळे लोकांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेऊ शकतो. कारण यापूर्वी साताऱ्यातील विकास कामांच्या विरोधात अडथळेच निर्माण केले गेले. मात्र, खऱ्या अर्थाने विकासकामे ही देवेंद्र यांनीच केली.
दरम्यान, रामराजे आणि तुम्ही एकत्र प्रवेश करणार आहात का, या प्रश्नावर उदयनराजे यांनी “ते राजे आहेत. त्यांचे घराणे मोठे आहे. माझी आणि त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. त्यामुळे कृपया मला त्यांच्याबरोबर जोडू नका,’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर उदयनराजे मला मदत करतील, अशी अपेक्षा आमदर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत “शेवटी धाकटे भाऊ आहेत, त्यामुळे मदत केलीच पाहिजे,’ अशी टिपणी उदयनराजे यांनी केली.