वीस हजारांची लाच घेताना पकडले
सातारा – वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या वाई तालुक्यातील बावधन येथील तलाठ्याला शुक्रवारी 20 हजारांची लाचा स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
शंकर मल्हारी कोळेकर (रा. धोम कॉलनी, वाई)असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदाराचा वाळूचा व्यवसाय असून त्याचा वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर शुक्रवारी (दि. 23) पहाटे कोळेकर याने पकडला होता.
हा ट्रॅक्टर त्याने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिला होता. मात्र, यापुढे कोणतीही कारवाई करायची नसेल तर 40 हजार रुपये द्यावे लागतील, असे कोळेकरने तक्रारदाराला सांगितले होते. त्यानंतर तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कोळेकर विरोधात तक्रार दिली.
एसीबीच्या पथकाने या तक्रारीची तत्काळ पडताळणी केली असता कोळेकर हा तडजोडीअंती 20 हजार रुपये मागत असल्याचे स्पष्ट झाले. एसीबीने लागलीच वाई तहसीलदारांच्या सरकारी निवासासमोर सापळा लावला. त्यावेळी कोळेकर तक्रारदाराकडून 20 हजाराची लाच स्वीकारताना अलगद जाळ्यात अडकला. त्याच्याविरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदराव सपकाळ, हवालदार राजेंद्र साळुंखे, सजंय अडसूळ, अजित कर्णे, मारुती अडागळे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले, नीलेश येवले, नीलेश वायदंडे, श्रद्धा माने, शीतल सपकाळ यांनी ही कारवाई केली.