नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक हे माझ्या कारकिर्दीमधील अखेरचे ऑलिम्पिक असेल. या स्पर्धेत पदक मिळवून कारकिर्दीची सांगता यशस्वी करण्याचे लक्ष्य आहे, असे मत भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कोम हिने व्यक्त केले आहे.
कारकिर्दीत सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरीने माझे 2012 ऑलिम्पिकमधील ब्रॉंझपदक देशातील तरुणींना या खेळाकडे वळविण्यासाठी प्रेरक ठरले याचा मला अभिमान वाटतो, असे सांगितले. मेरीने तब्बल 20 वर्षे बॉक्सिंगमध्ये व्यतीत केली.
पण, ऑलिम्पिक पदकासाठी तिला 2012 लंडन ऑलिम्पिकची वाट पाहावी लागली. लंडन ऑलिम्पिकपासूनच बॉक्सिंगमध्ये महिलांचा समावेश करण्यात आला आणि त्या पदार्पणाच्या वर्षातच मेरीने ब्रॉंझपदकाची कमाई केली. आता मी 38 वर्षाची आहे.
यापुढे शरीर किती साथ देईल हे सांगता येत नाही. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक हे माझे अखेरचे असेल, असे ती म्हणाली. बॉक्सिंगसाठी ऑलिम्पिकमध्ये 40 वर्षांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. करोनाच्या संकटकाळामुळे टोकियोसाठी 41 वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली असल्याने मेरीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.