2024 Paris Olympic Games – अनुभवी टेबल टेनिसपटू आणि राष्ट्रकुल खेळांचा चॅम्पियन शरथ कमल यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक असेल, तर अनुभवी बॉक्सर एम.सी. मेरी कोमची देशाच्या दल प्रमुख (शेफ डी मिशन) म्हणून गुरुवारी नियुक्ती करण्यात आली.
याबाबतची घोषणा करताना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) एका निवेदनात म्हटले आहे की, ४१ वर्षीय टेबल टेनिसपटू शरद ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा भारताचा अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या नावाची घोषणा करताना निश्चितच आनंद होत आहे.
मेरी कोमसह लुज या हिवाळी खेळात भारताचे नेतृत्व करणाऱ्या शिवा केशवन याची भारतीय दलाचा उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग शूटिंग रेंजवर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ऑलिम्पिकमधील शूटिंग रेंज मुख्य ठिकाणापासून दूर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत नेमबाजीतील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा १९ सदस्य असलेला संघ पाठवणार आहे.
या नियुक्त्यांवर भाष्य करताना, आयोओए अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या, ‘पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये आमच्या दलाचे नेतृत्व करण्यासाठी अधिकाऱ्यांचा इतका प्रतिष्ठित आणि सक्षम संघ मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांचे कौशल्य, समर्पण आणि खेळाबद्दलची आवड आमच्या खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आणि देशाचा गौरव करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.