सत्तेचा उन्माद (अग्रलेख)

कोणाचीही मग्रुरी, गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. अशा लोकांना तत्काळ पक्षाबाहेर घालवले जाईल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मंचावर उपस्थित नेत्यांना हे सुनावले आहे. त्यांच्या या उद्वेगाला काही कारणे आहेत. गेल्या काही दिवसांत विशेषत: त्यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्यावर त्यांचा हा राग होता. मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहेत. आकाश विजयवर्गीय हे त्यांचे नाव. त्यांचे वडील कैलास विजयवर्गीय भाजपचे ज्येष्ठ नेते. अमित शहांच्या खास टीममधले. भाजपने प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला जशास तसे जे उत्तर दिले त्याचे कैलास विजयवर्गीय हे पडद्यामागचे एक शिल्पकार. ममतांना जेरीस आणून आणि त्यांचे पंख छाटून भाजपने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याचे श्रेय पूर्णत: विजयवर्गीय यांना जात नसले तरी चषक जिंकणाऱ्या संघातील सर्वच खेळाडूंचे वजन आपोआप वाढतच असते.

भाजपने केवळ बंगालच नाही, पूर्ण देश जिंकला. तोही गेल्या वेळेपेक्षा जास्त धावांनी. त्यामुळे शहा आणि त्यांचे टीमचे वजन वाढले. त्याचा शहा यांना इनाम मिळाला. ते केंद्रात गृहमंत्री झाले. मात्र हे पद मिळाल्यानंतर किंवा त्याही अगोदर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाल्यानंतरही शहा यांची वर्तणूक संयत स्वरूपाची राहिली आहे. प्रचारसभांमधून त्यांनी आक्रमक शब्दांत विरोधकांवर टीका केली. मात्र, व्यक्‍तिगत द्वेष अथवा आपले अनावश्‍यक शक्‍तिप्रदर्शन होईल असे काही त्यांनी केले नाही. भूतकाळातील अनुभवांनी त्यांना शहाणे केले असावे. शिवाय “चाल, चरित्र और चेहरा’ यावर त्या पक्षाचा विशेष भर असतो. तेही एक कारण असावे. मात्र, त्यांच्या टीममधल्या लोकांना अथवा पक्षाच्या वाढत्या शक्‍तीवर आपले दंड थोपटणाऱ्यांना हे शहाणपण नाही. “हम रूलींग पार्टी के है,’ अशीच हवा डोक्‍यात असावी. त्यातून त्यांचा धुडगूस सुरू आहे. कैलासपुत्र आकाश याच जातीतले. त्यांच्यावर सध्याच्या विश्‍वचषक स्पर्धेचाही चांगलाच ज्वर चढलेला दिसतो. त्यांच्या भागात अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी कारवाईसाठी गेले होते. मग माननीय आमदार साहेबांनी थेट क्रिकेटची बॅटच हातात घेतली आणि अधिकाऱ्यांना मारहाण सुरू केली. बिचाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल काय बोलावे? आज शासकीय अधिकाऱ्यांची स्थिती अशी झाली आहे की समर्था घरच्या श्‍वानालाही घाबरावे लागते. येथे तर थेट नेता पुत्र. तेही लोकप्रतिनिधी असलेले. मार न खाऊन कोणाला सांगणार? पण घडला प्रकार समाजमाध्यमांतील काही नतद्रष्टांना रूचला नाही. त्यांनी केलेले चित्रण व्हायरल झाले. सोशल फ्रेंडली पंतप्रधानांनीही ते बघितले असावे. त्यांनाही ते रूचले नाही आणि त्यांनी कानउघाडणी केली. मात्र, हे नंतर झाले. अगोदर प्रथेप्रमाणे अथवा लोकलाजेस्तव आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली. कोणाला पकडून आणले आहे, हे सांगण्याची आवश्‍यकता नव्हतीच. लगोलग त्यांची सुटकाही झाली. तीही कायद्याने. त्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला, वाजतगाजत स्वागत केले. प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परत आले, असा काहीसा हा बाज. याच मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका प्रबल पटेल नामक व्यक्‍तीने जाहीर गोळीबार केला. त्याच्यासोबत त्याचा एक भाऊही होता. प्रबल पटेल हे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचे पुत्र. कोण हात लावणार? त्यातूनही त्यांच्या या कृत्याचे समर्थन करायला पुढे आले कोण, तर साक्षात मध्य प्रदेशचे मामाजी अर्थात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान. कारवाई करणाऱ्यांची हवाच निघून गेली. याच राज्यात सत्ताधारी पक्षाच्याच एका नगराध्यक्षाने काही अधिकाऱ्यांना बांबूने मारहाण केली. त्याचा प्रसाद काही महिला कर्मचाऱ्यांनाही मिळाला.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोलीस ठाण्यात घुसून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रात आजच एका आमदारांनी एका अधिकाऱ्याचा अंगावर चिखल ओतला. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांच्या समर्थकांनी संबंधित अधिकाऱ्याला बांधून ठेवले. खड्ड्यातून उडणाऱ्या पाण्याचा आणि चिखलाचा नागरिकांना किती त्रास होतो, हे त्या अधिकाऱ्यालाही समजावे हा “उदात्त’ हेतू त्यामागे होता. भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्याचे त्यांना आणि या देशाच्या लोकशाहीला श्रेय आहे. लोकशाहीत मतदार हाच आपले सत्ताधीश कोण असावे हे ठरवत असतो. मात्र, एकदा निवड झाली की पुढचे पाच वर्षे असहायपणे बघण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे नसावे, त्यांचे शिक्षण आणि अन्य गोष्टी कोणत्याही चार सुसंस्कृत लोकांप्रमाणे असाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, निवडणुकांच्या वेळी निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावला जातो. थोडक्‍यात, धटींगशाहीला प्रोत्साहन देत अशा धटिंगांचा मार्ग प्रशस्त केला जातो. त्यात ते सत्तेवर आले की ते आणि त्यांचे अनुयायी जमिनीवर पाय टेकवतच नाहीत. ते हवेतच असतात. आपण करू तो नव्हे, आपणच कायदा आणि आपणच न्यायाधीश. सगळे निवाडे तेच करतात. खटलेही तेच चालवतात. अर्थात हे सगळे आजच सुरू झाले आहे, अशातला भाग नाही. पूर्वीपासून सातत्याने अशी उदाहरणे घडत आहेत. अनेक बड्या नेत्यांचे अथवा त्यांच्या पुत्रांची वा नातलगांची नावे त्यात पुढे आली आहेत.

अगदी पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्‍तीही एका ज्येष्ठ नेत्याला एका विमानतळावर कशी तुच्छ वागणूक देऊ शकते तेही बातम्या आणि अन्य माध्यमांतून त्या त्या वेळी समोर आले आहे. असले प्रकार करणारा हा चुकलेलाच असतो. मात्र, त्याहीपेक्षा जास्त चूक असते ती त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची अथवा त्यांच्यावर कारवाई करणाऱ्यांनाच धाकात ठेवणाऱ्यांची. त्यामुळे पंतप्रधानांनी थेट कान टोचले ते बरेच झाले. आकाश विजयवर्गीय यांनी आपल्या पदाचा, सत्तेचा आणि त्यामुळे आलेल्या दांडगाईचा दुरुपयोग केला. एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांना समज देण्याचे काम त्यांच्या पित्याचे होते. तथापि, आपल्या पोरासमोर त्या अधिकाऱ्याची लायकीच काय अशी मुक्‍ताफळे या महाशयांनी उधळली. सत्ताधाऱ्यांची हीच वर्तणूक त्यांना स्वत:ला, त्यांच्या पक्षाला, लोकशाहीला आणि एकूणच देशाला लांच्छन आणणारीच असते. त्यातून व्यवस्थाच रसातळाला जाण्याचा धोका असतो. या सगळ्याचा फायदा उपजत गुन्हेगारीवृत्ती असलेल्या प्रवृत्ती घेत असतात. लोकप्रतिनिधींना जनतेच्या वतीने जाब विचारण्याचा अधिकार आहेच. मात्र, तो कोणत्या मार्गाने विचारायचा त्याचेही दंडक आहेत. दंडक सोडून दांडका उचलण्याचीच गरज आणि वृत्ती असेल तर आपण प्रगत झालोच नसून उलट्या दिशेनेच आपला प्रवास सुरू असल्याचे समजावे.

Leave A Reply

Your email address will not be published.