झिम्बाबवे करणार 30 हजार हत्तींची विक्री

हरारे – हत्तींच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त झालेल्या झिम्बाबवेने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून हतींची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी 30 हजार हत्तींना विकण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन संघ आणि संयुक्‍त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या शिखर परिषदेत याबाबतची चर्चा झाली.पर्यटनमंत्री प्रिस्का मुप्फुमिरा यांनी यावेळी सांगितले की झिम्बाब्वेतील सुमारे 30 हजार हत्तींची विक्री केली जाईल.

झिम्बाब्वे आपल्या देशातील हत्तींची अंगोला किंवा अन्य कोणत्याही इच्छुक देशांना विक्री करेल. सध्या हत्तींची संख्या सुमारे 84 हजार आहे. अंगोला हा देश 27 वर्षे गृहयुद्धाने ग्रस्त होता व हे युद्ध 2002 मध्ये संपले. त्यानंतर आपल्या देशात पुन्हा वन्यजीव वाढवण्यासाठी हा देश प्रयत्न करीत असल्याने त्या देशाला हे हत्ती देण्याची झिम्बाब्वेची योजना आहे.मे महिन्यात दुबई आणि चीनला 97 हत्ती विकण्यात आले.

त्यामधून देशाला सुमारे 20 कोटी रुपये मिळाले. हत्तींच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग तेथील वन्यजीवन, जंगल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केला जाणार आहे. आफ्रिकेतील झिम्बाब्वे, नामिबिया, बोत्सवाना आणि झांबिया या चार देशांमध्ये जगातील एकूण हत्तींपैकी निम्मे हत्ती आहेत!

Leave A Reply

Your email address will not be published.