मुंबई – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. कार्यकर्ते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी विनंती करत आहेत. मात्र, शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिले. दरम्यान, आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवार हे अध्यक्षपदावर राहणार आहेत कि नाही हे ठरणार आहे.
शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यास समितीच्या बैठकीची आवश्यकता उरणार नाही अशी प्रतिक्रिया खुद्द समितीच्या सदस्यांनीच व्यक्त केली आहे. मात्र, शरद पवारांनीच राजीनाम्याची घोषणा करताना या समितीची घोषणा करून ही समितीच अध्यक्षपदाविषयी निर्णय घेईल, असे जाहीर केल्यामुळे आजच्या समितीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अशात आज मुंबईत अनेक परिसरात तसेच जिल्ह्याजिल्ह्यात पोस्टरबाजी करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं आहे. तेव्हापासूनच आजपर्यंत कार्यकर्ते अजुनही शरद पवारांची मनधरणी करत आहेत. आज, उद्या, परवा… साहेब, साहेब आणि फक्त साहेबच अशा मजकुराचे पोस्टर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी लावण्यात आले आहे.