आजचा दिवस मतदार राजाचा

देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक आज होत आहे. गेल्या महिन्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली होती त्यामुळे गेले काही दिवस जर राजकीय पक्षांचे असतील तर आजचा दिवस मतदाराचा आहे. लोकशाही राजकारणात मतदाराला राजा मानले जाते त्यामुळे मतदाराने मतदाराने राजाच्या भूमिकेतूनच आज आपला मतदानाचा हक्‍क बजवायला हवा. मतदान म्हणजे आपल्याला हवे तसे सरकार किंवा आपल्याला हवा तसा लोकप्रतिनिधी निवडण्याची मोठी संधी असते. सुजाण आणि सजग नागरिकांनी आपला हा हक्‍क बजावला तरच त्यांना नंतर सरकारविरोधात किंवा आपल्या लोकप्रतिनिधी विरोधात आवाज उठवण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकतो.

आज मतदानाचा दिवस सोमवारचा असल्याने जोडून आलेल्या सुटीचा लाभ पदरात पडून घेण्यासाठी अनेकांनी पर्यटनाचा पर्याय निवडला असेल तसे झाले, तर नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडण्यात त्यांना अपयश आले असेच म्हणावे लागेल. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक सोडता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्‍का कधीही घसघशीत नसतो. 70 ते 80 टक्‍क्‍यांच्या दरम्यान हे प्रमाण राहिले तरी मतदान चांगले झाले, असे म्हणण्याची प्रथा आहे. लोकशाहीचा प्रमुख घटक असलेल्या मतदारांपैकी 20 ते 30 टक्‍के मतदार मतदानच करीत नाहीत. गेल्या काही वर्षांत मतदानाचा हा टक्‍का वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. त्याचा थोडा परिणाम दिसत असला तरी मतदारांनी स्वतःहून या प्रक्रियेत भाग घेण्याची गरज आहे.

सरकारी पातळीवर यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, अमरावती शहरात हॉटेल ऍन्ड रेस्टॉरंट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांसाठी मतदानाच्या दिवशी बिलावर दहा टक्‍के सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी हॉटेल मालकांनी एकावर एक फ्री सारख्या योजना राबवल्या आहेत. तरुण नवमतदारांनी मतदान करावे म्हणून काही अभिनव योजना आखण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खासगी पातळीवर असे प्रयत्न केले जात असताना मतदारांनी त्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे. पाच वर्षांतून एकदा येणारा हा दिवस चुकवणे म्हणजे लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात भाग न घेण्यासारखे आहे.

राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीतच असतात; पण तो त्यांच्या निवडणूक प्रचार कामाचाच एक भाग असतो. मतदारांसाठी वाहने उपलब्ध करणे, चहा आणि नाश्‍ता देणे आदी उपक्रम चालूच असतात. दुसरीकडे सरकारनेही दिव्यांग, दृष्टिहीन आणि वयोवृद्ध व्यक्‍तींना आपला हक्‍क बजावता यावा म्हणून अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सर्व उपक्रमांना प्रतिसाद मिळून मतदानाचा टक्‍का वाढला तरी भरपूर झाले.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानावेळी नोटा या पर्यायाचा वापर मतदाराने खूपच विचारपूर्वक करण्याची गरज आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेला एकही उमेदवार पसंद नसेल तर नोटा हा पर्याय, आपली नापसंती नोंदवण्याचा अधिकार कायद्याने मतदाराला दिला असला तरी आपले एक मतही निर्णायक ठरू शकते याचा विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही काळात झालेल्या निवडणुकीत नोटा हा पर्याय अधिक प्रमाणात वापरला जात आहे. काही निवडणुकीत नोटाला मिळालेली मते निर्णायक होती म्हणजेच विजयी उमेदवार जितक्‍या मताधिक्‍क्‍याने निवडून आला होता त्यापेक्षा जास्त मते नोटाला पडली होती. अशा घटना पाहता या नकाराधिकाराचा विचारपूर्वक वापर करून शक्‍यतो उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वात चांगल्या उमेदवाराची निवड करणे योग्य ठरेल. आधुनिक राजकारणात चांगले आणि वाईट यामध्ये फरक करणे अवघड असले तरी तारतम्याचा वापर करून हा निर्णय लागेल.

गेल्या तीन आठवड्याच्या काळात विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षांची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मांडली आहे. आपण काय करणार आहोत हे दाखवणारे जाहीरनामेही प्रकाशित केले आहेत. निवडणुकीत सत्ता मिळवणे ध्येय असल्याने राजकीय पक्षांनी आश्‍वासनांचा पाऊस पाडणे काही गैर नाही. अर्थात त्यामुळे मतदाराचा गोंधळ होऊ शकतो. राजकीय पक्ष हुशारीने आपला प्रचार करीत असल्याने सर्वसामान्य मतदाराला सर्वांचेच मुद्दे पटतात कोणत्याही विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी नसलेला मतदार जास्तच गोंधळून जातो. अशावेळी त्याने तारतम्य आणि हुशारी वापरून निर्णय घेण्याची गरज असते. याचा मतदारांच्या मतांवर सत्तेचे समीकरण अवलंबून असते लोकशाही राजकारणात सत्ताबदल होण्यामागे असेच मतदार कारणीभूत असतात. राजकीय पक्षांनाही याची जाणीव असल्याने आपल्या पक्षाचे नेहमीचे मतदान जास्त होईल याकडे लक्ष देण्याकडे त्यांचा काळ असतो. अर्थात कार्यकर्ता मतदार असो किंवा सर्वसामान्य मतदार असो सर्वांनीच विचारपूर्वक मतदान करणे योग्य ठरते.

प्रथमच मतदान करणारे नवमतदार अनेकवेळा आपले मत सोशल माध्यमातील चर्चेवरून तयार करीत असतात; पण असे करणे चुकीचे आणि धोकादायक ठरू शकते. आपले पहिलेच मत योग्य उमेदवाराला मिळेल याची खात्री त्यांनी करून घ्यायला हवी. त्यासाठी केवळ इतरांच्या मतांवर अवलंबून न राहता अभ्यासपूर्वक स्वतःचे मत बनवायला हवे. गेल्या काही वर्षांत नवमतदारांची ही मतेही निर्णायक ठरत आहेत हे विसरून चालणार नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच असतात; पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आपले सरकार निवडण्याचा हक्‍क प्राप्त होतो. मतदाराचे दैनंदिन आयुष्य सरकारच्या कामगिरीवर अवलंबून असते. म्हणूनच पाच वर्षांतून एकदा मिळणारी संधी मतदारांनी दवडता कामा नये. आजचा दिवस आपला आहे याच भावनेतून सर्वांनी आज पाऊस आणि इतर सर्व अडचणींना न जुमानता मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार
पाडायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.