कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. तर दूपारी चार वाजल्यानंतर ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह सर्वत्र जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर शहरातील सखल भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ऑक्‍टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेवर परिणाम होणार असून मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे दिवाळी सणाची खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. तर फेरीवाले विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.

शुक्रवारपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरु झाला. शनिवारी दुपारी सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अखेरच्या दिवशी काहीअंशी अडथळा निर्माण झाला. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता पुन्हा काळे ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृष्य पाऊस सुरु झाला. सायंकाळी 7 वाजेपर्यंत जोरदार पाऊस सुरुच होता. त्यामुळे ओढे, नाले, पुन्हा ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली. तर अनेक घरांची पडझड झाली.

रविवारी सायंकाळी सलग तीन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे व्हिनस कॉर्नर, लक्षीपुरी व्यापारपेठ, सीपीआर चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक आदी शहरातील सखल भागात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, कागल आणि भुदरगड तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. हवामानाच्या अंदाजानुसार प्रशासनाने जिह्यात ठिकठिकाणी वीज पडण्याचा इशारा दिला होता. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)