कोल्हापूर (प्रतिनिधी) – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे उड्डाणपुलाखाली अज्ञात वस्तूचा स्फोट झाल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. य घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह तज्ज्ञांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मिळालेल्या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची तपासणी करण्यात येत आहे.
दत्तात्रय गणपती पाटील (वय 56, न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. स्फोटाच्या तीव्रतेने ट्रकच्या काचा फुटल्या. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना उपचारास नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या कुळ शिरगाव येथे माल पोहोचवण्यासाठी ट्रक घेऊन दत्तात्रय पाटील गेले होते. तिकडून घरी परतत असताना शाहू टोल नाक्याजवळील पुलाजवळ ट्रकचा रॉड तुटल्याने त्यांनी ट्रक रस्त्याकडेला लावला. घरी येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने त्यांनी सहकारी आशिष चौगले (रा. रुईकर कॉलनी परिसर) यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. काही वेळात आशिष आपल्या दुचाकीवरुन तेथे पोहोचले. पाऊस आल्याने दोघे पुलाखाली थांबलेले होते.
यावेळी दत्तात्रय पाटील यांना मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. ते काही अंतर पुढे गेले. याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. पुलाखाली अंधार असल्याने नेमका कशाचा स्फोट झाला हे समजू शकले नाही. तसेच आशिष चौगलेही बाजूला पडले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारील महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत पाटील व आशिष चौगले यांना रुग्णवाहिकेतून शासकीय इस्पितळात पाठविले.
पाटील यांच्या दोन्ही पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला. कानठळ्या बसल्याने आशिष यांनाही अस्वस्थ वाटू लागले. त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
स्फोट नेमका कशाचा?
घटनेची माहिती समजताच सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अभीनव देशमुख, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. दोघेही याठिकाणी आले. स्फोट नेमका कशाचा झाला हे स्पष्ट होत नसल्याने स्फोटकांची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पडलेल्या वस्तूंची तपासणी केली.