नवी दिल्ली : हवाई संरक्षण विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने मागवला. तीनही सेवा दलांमध्ये मदतीचा सेतू उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी एकात्म संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
हा प्रस्ताव देण्यासाठी रावत यांनी 30 जून 2020 ही अंतीम मुदत दिली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली. हवाई दल, लष्कर, नौदल आणि तटरक्षक दल यांच्या प्रमुखांकडे या चारही विभागातील ताळमेळ आणि एकजिनसीपणा येण्यासाठी शिफारसी मागवल्या आहेत.
त्यांनी या दलांच्या प्रशिक्षण पध्दतीवर विशेष भर दिला आहे. या मुद्द्यावरील चर्चेतून आशावादी स्रोत निर्माण होऊ शकतील. निष्फळ समारंभ कमी करावेत कारण त्यासाठी खूप मनुष्यबळ लागते, असे ते म्हणाले.
या तीनही दलांच्या उपकरणांच्या देखभाल दुरूस्तीसाठी एकच तळ उभारावा त्यामुळे मनुष्यबळ आणि आर्थिक बचत होईल. या दलांमधील ताळमेळीच्या प्राधान्यक्रमांसाठी त्यांनी 30 जून आणि 31 डिसेंबर अशी मुदत आखून दिली आहे. दोन किंवा अधिक दलांसाठी समान सामरिक मदतीचा सेतू उभारण्यासाठी आणि एकजिनसीपणा येण्यासाठी त्यांनी काही क्षेत्र निश्चित केले आहेत.