पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सरहद, पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्हम संस्थेच्या सहकार्याने सरहद शौर्यथाॅन या आंतरराष्ट्रीय कारगील मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथाॅन दि. ३० जून रोजी लडाख येथे झोजिला वाॅर मेमोरिअल ते कारगील वाॅर मेमोरिअल द्रास यादरम्यान होणार आहे.
सहरद संस्थेचे संजय नहार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी अर्हम संस्थेचे डाॅ. शैलेश पगारिया, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर व तांत्रिक संचालक वसंत गोखले व युवराज शहा उपस्थित होते. स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. झोजिला युद्ध विजय अमृतमहोत्सव व कारगील युद्ध विजय रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ही मॅरेथाॅन आयोजित करण्यात आली असून, यात सुमारे दीड हजार धावपटू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत पुरुष व महिलांसाठी ४४ किमी झोजिला वाॅर व्हिक्टरी मॅरेथाॅन, २५ किमी कारगील व्हिक्टरी रन, १० किमी आणि ७.५ किमी टायगर हिल व्हिक्टरी रन या अंतराच्या स्पर्धा, तसेच पुरुष, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ४ किमी अंतराच्या फिटनेस रनचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यांना ४ लाखांची रोख पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी ३० एप्रिलपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सविस्तर माहिती सरहद कारगील मॅरेथाॅन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये महाराष्ट्रातील धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डाॅ. पगारिया यांनी केले आहे.