मुंबई : इराणच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांचा बगदादमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जगभरातील कमोडिटी आणि शेअर बाजारांवर त्याचे पडसाद उमटले. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1541.20 डॉलर प्रति औस असून या दोन्ही वस्तूंचा गेल्या तीन महिन्यातील उच्चांकी दर आहे. कमोडिटीमध्ये तेजी असली तरी भांडवली बाजारात पडझड झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 162 अंकांनी घसरला.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने मध्य-पूर्वेतील राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला असून मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. दरम्यान, आज कमोडिटी बाजारात सोने दरात तेजी दिसून आली आहे. अमेरिकेत सोने 0.6 टक्क्याने वधारले. सोन्याचा दर 1541.20 डॉलर प्रति औस आहे.
आठवडाभरात स्पॉट गोल्डच्या दरात 1.9 टक्के वाढ झाली आहे. सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या किमतीतमध्ये देखील वाढ झाली. ज्यात चांदी 0.5 टक्के, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी वधारले. इराण आणि अमेरिकेतील संभाव्य युद्ध परिस्थितीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअरची विक्री करत पैसे काढून घेणे पसंत केले.
यामुळे आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स 162 अंकांनी घसरला आणि 41465 अंकावर बंद झाला. निफ्टी 56 अंकांनी घसरला आणि 12227 अंकावर बंद झाला. आजच्या सत्रात ऑटो आणि तेल वितरक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी विक्री केली. युरोप आणि आशियातील शेअर बाजारांवर दबाव दिसून आला.