पुणे – महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यातील 750 रिक्त पदांवरील भरती राज्य सरकारकडून मान्यता मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी मनुष्यबळ अपुरा पडत असल्याने सर्व सेवा देण्याला अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावेत, असा प्रस्ताव महिला बालकल्याण समिती पुढे ठेवण्यात आला होता. त्यावर प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरणार असल्याचा अभिप्राय दिला आहे.
अभिप्रायासह प्रस्तावास बुधवारी महिला बाल कल्याण समितीने मंजुरी दिली. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा महागल्याने ती सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यात जातात. मात्र, तेथे उपचार मिळण्यात मनुष्यबळाअभावी अडथळे येत आहेत. बराचवेळ प्रतिक्षा करावी लागते. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये काही प्रमाणात सोयीसुविधा असल्या तरी, उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच कमतरता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकदा गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.
आजमितीला 815 पदे रिक्त…
शहराच्या आरोग्य विभागात आजमितीला 1 हजार 878 पदे मंजूर आहेत. पैकी 1,063 पदे कार्यरत असून, 815 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये सर्वाधिक पदे डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विशेषज्ञांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये न्यूरोसर्जन, हृदयरोग तज्ज्ञ, छातीरोग तज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील फिजिशियन, निवासी फिजिशियन, शल्यविशारद यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचा समावेश आहे.