नवी दिल्ली :पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी ही कारवाई केली. पीएमसी बॅंकेच्या माजी संचालकासह तीन जणांना अटक करण्यात आली. 4 हजार 335 कोटींचा हा घोटाळा असून याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जसविंदर सिंग बानवैत, विश्वनाथ श्रीधर प्रभू आणि श्रीपाद गोविंद जेरे यांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढे असे सांगितले की, एचडीआयएल समूहाशी जोडलेल्या 4 हजार 335 कोटींचा घोटाळा ज्यावेळी झाला होता तेव्हा बानवैत हे बॅंकेचे संचालक होते. तसेच ते कर्ज, गुंतवणूक आणि कार्यकारी समितीचे सदस्य देखील होते.
पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी चौकशीसाठी जसविंदर सिंग बानवैत, विश्वनाथ श्रीधर प्रभू आणि श्रीपाद गोविंद जेरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.