कॉंग्रेस सदस्य बनण्यासाठी मद्यापासून रहावे लागणार दूर; सदस्यत्वासाठी पक्षाकडून नियमावली जाहीर

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाचे सदस्य बनायचे असल्यास मद्य आणि अंमली पदार्थ सेवनापासून दूर रहावे लागणार आहे. तसेच, स्वपक्षावरील जाहीर टीका टाळणे अनिवार्य ठरणार आहे.

कॉंग्रेसच्या वतीने 1 नोव्हेंबरपासून सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. ती मोहीम पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत चालेल. त्या मोहिमेसाठी कॉंग्रेसने सदस्यत्व अर्ज तयार केले आहेत. त्या अर्जात दहा सुत्रांवर भर देण्यात आला आहे. त्यांचे पालन कॉंग्रेसचे सदस्य बनू इच्छिणाऱ्यांना करावे लागणार आहे. तशी हमी नव्या सदस्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागेल.

महत्वाच्या हमींमध्ये कायद्याला मान्य असणाऱ्या मर्यादेपलिकडे मालमत्ता न जमवण्याचाही समावेश आहे. तसेच, पक्षाच्या कार्याचा भाग म्हणून शारीरिक श्रमाची तयारी ठेवावी लागेल. सामाजिक भेदभावाला थारा न देण्याची ग्वाहीसुद्धा नव्या सदस्यांना द्यावी लागेल.

उत्तरप्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम महत्वाची ठरणार आहे. त्याशिवाय, पुढील वर्षी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. नवा पक्षाध्यक्ष निश्‍चित करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. ती प्रक्रिया पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.