जेजुरी – खंडेरायाची जेजुरी नगरी ही धार्मिक व ऐतिहासिक म्हणून प्रचलित आहे. राज्यातून व देशाच्या विविध प्रांतातून येणाऱ्या भाविकभक्तांच्या कुलधर्म-कुलाचार, जागरण गोंधळ, पूजा, अभिषेक, देवदर्शन यावर शहराचे अर्थकारण चालते, त्यातून महत्त्वाचे म्हणजे मार्च ते जून हा कालावधी येथल्या जत्रा यात्रा उत्सवांचा हंगाम समजला जातो. या कालावधीत किमान 50 लाखांपेक्षा अधिक भाविक जेजुरीत दाखल होत असतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे राज्यातील भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने शहराचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन धार्मिक विधी वगळता देवांचे जत्रा यात्रा उत्सव साजरे करण्यात आले नाहीत.एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनाही देवदर्शन बंदच आहे. इतर राज्यातील मंदिरे देवदर्शनासाठी खुली करण्यात येत असल्याने व सध्या राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी खुले होणार का? असा प्रश्न राज्यातील भाविकांना पडला असून अद्यापतरी मंदिर खुले करणार नसल्याचे देवसंस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्वसामान्य व्यावसायिक, सेवेकरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भंडारा खोबरे, प्रसादपुडे, हार फुले, उपहारगृहे, मिठाई दुकाने, पूजा साहित्य विक्रेते आदींचे मोठे नुकसान झाले आहे. त्याहून गंभीर स्थिती मंदिरात धार्मिक विधीतून उदरनिर्वाह करणाऱ्या सेवेकऱ्यांची झाली आहे.
पुढील आदेश येईपर्यंत…
खंडेरायाचे मंदिर भाविकांना देवदर्शनासाठी 18 मार्च पासून बंद आहे. पुढील काळात देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजना बाबत जोपर्यंत प्रशासनाकडून आदेश, सूचना, मार्गदर्शन प्राप्त होत नाही तोपर्यंत भाविकांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार नाही. मात्र “श्रीं’चे नित्याचे धार्मिक विधी नियमाने सुरूच राहणार आहेत.
खंडेरायाचे मंदिराबाबत प्रशासनाचे आदेश व सूचना प्राप्त झाल्यानंतर महसूल, तहसीलदार, आरोग्य, नगरपालिका, पोलीस प्रशासनासह पुजारी-सेवेकरी व ग्रामस्थ मंडळाची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेश, सूचना आणि मार्गदर्शन यांची माहिती व त्याची काटेकोर अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात येणार आहे. देवदर्शनासाठी मंदिर खुले करताना भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, जंतूनाशक फवारणी स्वच्छता, भविकांमधील सुरक्षित अंतर आदी उपाययोजनाबाबत देवसंस्थान व्यवस्थापन सज्ज करण्यात येत आहे.-संदीप जगताप, प्रमुख विश्वस्त.