भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलेल

वेदांतिकाराजे भोसले; सर्वांगिण विकासासाठी दोन्ही राजेंना निवडून देण्याचे आवाहन

सातारा – विकास हि सतत चालणारी प्रक्रिया आहे. सातारा शहरात मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याबरोबरच पुढील 50 वर्षांचा विचार करता कास धरणाची उंची वाढवणे, ग्रेड सेपरेटर यासह हद्दवाढ आणि प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण हि कामे मार्गी लागली आहेत. दोन्ही राजांच्या माध्यमातून विविध विकासकामे होत आली असून मेडिकल कॉलेज, शिवसृष्टी, नवीन एमआयडीसी, मेगा प्रोजेक्‍ट आदी मोठी कामे करायची असतील तर भाजप शिवाय पर्याय नाही. भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलेल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच यासाठी दोन्ही राजेंना मताधिक्‍याने निवडून द्या, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शहरातील शुक्रवार पेठेत झालेल्या कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या.

यावेळी सौ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले, विजय काटवटे, धंनजय जांभळे, प्रकाश कोळेकर, वसंत जोशी, अजय बडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होतो. अजिंक्‍यतारा कारखाना, सूर गिरणीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. चाळकेवाडी पठारावर 2800 मेगाव्याट वीज निर्मिती सुरु असून यातून वीजेबरोबरच हजारो लोकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

याशिवाय कास धरण उंची वाढ, कास पठार, ठोसेघर, वजराई धबधबा याच्या माध्यमातून पर्यटन वाढ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, ठिकठिकाणी रस्त्यांचे जाळे, रिंग रोड, संपूर्ण मेढा भाग कोयना विभागाला जोडणारा कुसुंबी मार्गे रस्ता, महू हातेघर धरण, बोन्डारवाडी धरण तसेच सातारा शहराची हद्दवाढ, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी 50 कोटी, अशी असंख्य कामे मार्गी लावून शिवेंद्रराजेंनी सातारा-जावलीचा कायापालट केला आहे. आगामी काळात हा मतदारसंघ शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून रोल मॉडेल बनण्यासाठी सत्ताधारी भाजपची साथ मोलाची ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांनाच विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. राम हादगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. सभेला सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)