सत्यजितसिंहांसारखा मी पळून नव्हतो गेलो

आमदार शंभूराज देसाई यांची सांगता सभेत टीका

पाटण – माझ्या आजारपणावर राष्ट्रीय नेते असणारे खासदार शरद पवार यांनी भाष्य केले. परंतु आजारपण कोणाला सांगून येत नाही. पाटण तालुक्‍यात उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीत मी जेसीबीत बसून पाटणला आलो. मात्र शरद पवारसाहेब तुम्ही ज्या उमेदवारासाठी मते मागायला आला होता, त्यांच्यासारखा मी परदेशात पळून गेलो नव्हतो, अशी खरमरीत टीका आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर केली. पाटण येथे झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी यु. टी. माने, जयवंतराव शेलार, विक्रमबाबा पाटणकर, पंजाबराव देसाई, दिलीपराव चव्हाण, प्रकाश पाटील, रविराज देसाई, यशराज, डी. पी. जाधव, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मल्हारपेठ येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर सभेत शरद पवार यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. वास्तविक शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने ते राज्यातील साखर कारखानदारी व राज्य व देशपातळीवरील विषयावर बोलतील असे मला वाटले होते. परंतु माझ्या आजारपणाचा मुद्दा जाहीर सभेत उपस्थित करून शरद पवार साहेबांनी माझ्यावर टीका केली. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो साहेब आजारपण कोणाला सांगून येत नाही. अतिवृष्टीच्या काळात तालुक्‍यातील जनतेला दिलासा देण्यासाठी मी आजारी असताना तालुक्‍यातील जनतेसाठी आलो होतो. तर निसरे याठिकाणी एनडीआरएफ च्या बोटीतून लोकांना भेटण्यासाठी गेलो. मात्र पवारसाहेब तुम्ही तुमच्या ज्या उमेदवारासाठी तालुक्‍यात मते मागण्यासाठी आला होता. त्या उमेदवारासारखा मी परदेशात पळून गेलो नव्हतो.

लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व. शिवाजीराव देसाई यांचा वारसा जपण्याचे तालुक्‍याच्या जनतेच्या साक्षीने ठरवले, तेव्हाच शंभूराज अगोदर पाटण तालुक्‍यातील जनतेचा असेल नंतर देसाई परिवाराचा असेल असे मी माझ्या परिवाराला सांगून टाकले होते. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेसाठी आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आजारपणाची काळजी आपण करू नये, असा टोलाही त्यांनी शरद पवार साहेबांना लगावला.

यावेळी विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, तालुक्‍यात व्याघ्र प्रकल्प बावीस गावातील जनतेच्या मानगुटीवर बसवण्याचे काम माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व त्यांच्या पीए यांनी केले. व्याघ्र प्रकल्पाच्या प्रश्नासाठी तालुक्‍यातील जनतेला अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढावे लागले. तसेच नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी जनतेच्या कवडीमोल दराने जमिनी धनदांडग्या लोकांनी विकत घेतल्या आहेत. ज्या गावांमध्ये जमीन विक्रीच्या व्यवहारावर बंदी होती. अशा गावांमध्ये दलालांनी धनदांडग्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. यासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे.

भरपावसात सभा
शंभूराज देसाई यांनी तहसील कार्यालयासमोरील पटांगणात सांगता सभा आयोजित केली होती. मात्र या सभेला पावसानेही हजेरी लावली. सभेपूर्वी पाटणमधून रामापूर ते तहसील कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. यावेळीही पावसाने हजेरी लावल्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले. सभा सुरू झाल्यानंतर शंभूराजे यांच्या भाषणावेळी पाऊस पडू लागला. मात्र कार्यकर्त्यांनी कोणतीही हालचाल न करता उभ्या पावसात सभा ऐकली.

शंभूराज देसाई यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
आज पाटणमध्ये शंभूराज देसाई, लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रामपूर येथील मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन त्यांनी रॅलीला सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने शंभूराजे देसाई जिंदाबादफ, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आलाफ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)