कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर, ता. कराड येथे शुक्रवारी सायंकाळी नागरिकांनी ङ्गबर्निंग कारफचा थरार अनुभवला. कोल्हापूरहून पाटणकडे निघालेल्या कारला मलकापूर येथील शिंदे होंडा शोरूमसमोर सायंकाळी पाच च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली. कारचालक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे कारमधील तिघांचे जीव वाचले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, युवराज पाटील (रा. पाटण) हे कार (एमएच-04-बीएस 6982) मधून पत्नी व मुलीसह कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. तेथील काम आटोपून ते पाटणला परत निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूर, ता. कराड येथील शिंदे होंडा शोरूमसमोर सायंकाळी 5 च्या सुमारास कार पोहोचली असता, कारच्या बॉनेटमधून धूर येताना चालकाला दिसला. त्याने कार तातडीने रस्त्याकडेला थांबवली. तोपर्यंत कारच्या पुढील भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते.
कार पेटल्याची माहिती समजताच, जवळच असलेल्या डीपी जैनचे पीआरओ दस्तगीर आगा, संभाजी घुटुगडे, दिलीप कुमार, नीलेश, अनिल कांबळे, राकेश, अभिषेक, संभाजी लाखे, नीलेश औंधकर, शंकर लाखे, गणेश खोत, व्यावसायिक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारमधील सर्वांना सुखरूप बाहेर काढले. डीपी जैनच्या मिक्सर गाडीतील पाण्याचा फवारा मारून, कारची आग आटोक्यात आणायचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, आग आटोक्यात न आल्याने कराड पालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलातील जवानांनी कारची आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कार जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.