गाळ्यावरून पर्यवसान : जखमीवर उपचार सुरू
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावामध्ये दुकान गाळ्यावरून दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली आहे. यात दोन्ही कुटुंबातील लोक जखमी झाले आहेत. यावेळी चारचाकी गाडीचे नुकसान करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावामध्ये अनेक वर्षापासून दोन नेवसे कुटुंबामध्ये वादावादी सुरू आहे. या दोन कुटुंबामध्ये डोर्लेवाडी ग्रामपंचायत समोरील जागेवरील बांधलेल्या गाळ्यावरून वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयीन दावा देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही नेवसे कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. यात चार चाकी गाडी देखील फोडण्यात आली आहे. हाणामारीत दोन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहेत. हाणामारी करणारे चुलत भाऊ आहेत. यात जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, अचानक झालेल्या या हाणामारीमुळे डोर्लेवाडी गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारामती शहर पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.