श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी महत्त्वपूर्ण कारवाई करताना तीन खतरनाक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉन्टेड सदस्य मुदासीर पंडित आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यांच्या शोधासाठी रविवारी रात्री विशेष मोहीम हाती घेण्यात आली. दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या घराला सुरक्षा जवानांनी वेढले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये रात्रभर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले.
अब्दुल्ला उर्फ असरार आणि खुर्शिद मिर अशी ठार झालेल्या इतर दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. अब्दुल्ला हा पाकिस्तानी नागरिक होता. त्या तिघांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. अनेक दहशतवादी हल्ल्यांत आणि हत्यांमध्ये ते सामील होते.
अलिकडेच सोपोरमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले. त्यातील एका हल्ल्यात दोन नगरसेवक मृत्युमुखी पडले, तर एक पोलीस शहीद झाला. दुसऱ्या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण आले. त्याशिवाय, दोन नागरिकांचाही मृत्यू झाला. त्या हल्ल्यांमागे मारले गेलेले दहशतवादी होते.