इस्लामाबाद – पाकिस्तानी तालिबान या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान तीन जण ठार झाले आहेत. तर जवळपास 23 जण जखमी झाले आहेत. गस्तीवरील पोलिसांच्या ट्रकला दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली रिक्षा धडकावून हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये 20 सुरक्षा रक्षक आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
क्वेट्टा शहरातील बलेली भागामध्ये दहशतवाद्यांनी हा आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला. पोलिओ लसीकरण पथकाला सुरक्षा देण्यासाठी हे पोलीस तैनात करण्यात आले होते. या आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला क्वेट्टा शहराच्या पोलीस उप महानिरीक्षकांनी दुजोरा दिला आहे. या स्फोटामुळे पोलिसांचा ट्रक उलटून पडला. या स्फोटासाठी किमान 25 किलो स्फोटके वापरण्यात आली असावीत, असा अंदाज आहे. एकूण 3 वाहने स्फोटासाठी वापरण्यात आल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्विकारली आहे. दोनच दिवसांपूर्वी या संघटनेने युद्धबंदी संपुष्टात आल्याचे जाहीर केले होते. या संघटनेचा म्होरक्या अब्दुल वाली उर्फ ओमर खलिद खुरसानी हा ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये मारला गेला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून “टीटीपी’ने हा बॉम्बस्फोट घडवल्याचे मानले जाते.
पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा जोरदार निषेध केला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. जखमी पोलिसांवर उपचारांसाठी रुग्णालयातील आपत्कालिन यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.
Submarine Deal : …तर चीनबरोबरच्या पाणबुडी करारातून थायलंड घेणार माघार
पोलिओ लसीकरण धोक्यात…
पाकिस्तानमध्ये अलिकडच्या काळात पोलिओ लसीकरण पथकांवर पुन्हा एकदा हल्ले व्हायला लागले आहेत. या लसीकरण पथकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊ लागला आहे. मार्चमध्ये लसीकरण पथकातील कर्मचारी महिलेला गोळ्या घालून मारण्यात आले होते. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पोलिओ लसीकरण पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचीही अशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अफगाण-पाकिस्तान सीमेवरील भागांमध्ये पोलिओ लसीकरण नगण्य झाले आहे. त्यामुळे या भागातच पोलिओचे रुग्ण सापडू लागले आहेत.